सलग दोन महिने मणिपूर धगधगतंय मात्र सरकार निष्क्रिय; जयंत पाटील 

महाराष्ट्र

मुंबई: मणिपूर येथे घडणाऱ्या हिंसाचार विरोधात व केंद्र सरकारच्या निष्क्रियतेविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय परिसरातील गांधी पुतळ्यासमोर मौन व्रत धारण करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाबाबत माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, भारतात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती किती ढासळलेली आहे हे मणिपूर येथील घडणाऱ्या हिंसाचारातून लक्षात येते.

दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. तिथलं राज्यातील सरकारही भाजपचे आहे आणि केंद्रातील सरकारही भाजपचं आहे. मात्र हा हिंसाचार थांबवण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नाही आहे. मणिपूर येथील हिंसाचारावर संताप व्यक्त करताना ते म्हणाले की, अनेक जण मृत्यूमुखी पडले आहेत, महिलांवर अत्याचार केले जात आहे, त्यांच्या हत्या केल्या जात आहे. अतिशय किळसवाणा प्रकार महिलांसोबत केला जात आहे. तिथल्या सामान्य माणसाला अत्यंत असुरक्षित वाटत आहे. सरकार विरोधातील देशातील लोकांच्या भावना संतप्त आहेत.

केंद्र सरकारने तिथे लष्कराचे पाचारण करून मणिपूर शांत करायला पाहिजे मात्र दोन महिने धगधगत्या मणिपूरकडे सरकार कोणतेही लक्ष देत नाही. सरकारच्या या निष्क्रियतेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज राज्यभरात आंदोलन केले आहे, असे त्यांनी सांगितले. सरकार म्हणतंय विरोधक मणिपूरवर संसदेत चर्चेला तयार नाही मात्र आपचे खा. संजय सिंग यांनी मणिपूर हिंसाचारावर चर्चेची मागणी केली तेव्हा त्यांना निलंबित करण्यात आले. विरोधी पक्ष मणिपूरवर चर्चेची मागणी करतोय मात्र त्यांना बोलू दिले जात नाही. ही गोष्ट धक्कादायक आणि दुर्दैवी आहे, असा रोष त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, महाराष्ट्रातही महिला व मुलींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे असे म्हणत, आम्ही हा विषय विविध आयुधामार्फत सभागृहात उपस्थित करत आहोत. मात्र सरकारमार्फत यात चालढकल केली जात आहे असा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला. महिला व मुलींना आखाती देशात घेऊन जातात, त्यांच्याकडून चुकीचे कामे करून घेतात. यात अनेक रॅकेट कार्यरत आहेण. या रॅकेट्सवर एफआयआर दाखल झाले आहेत मात्र त्यासंदर्भात शासनाने कोणतीही कारवाई केली नाही. बेपत्ता महिला व मुलींपैकी काही महिला व मुली मदत मागत असतात मात्र सरकारकडे त्याबाबत यंत्रणा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रश्न विविध माध्यमातून हा प्रश्न लावून धरणार व हा प्रश्न तडीस लावणार असे आश्वासन त्यांनी दिले.