‘मास्टर ब्लास्टर’ सचिन अहिरांच्या हाती विधान परिषदेच्या उपसभापती पदाची धुरा

महाराष्ट्र राजकीय

पक्षापेक्षा नियम मोठे, भावनेपेक्षा परंपरा मोठी’; उपसभापती म्हणून सर्वांना समान न्याय देण्याचा विश्वास

मुंबई: राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत त्यांचे अभिनंदन करत त्यांना “राजकारणातील मास्टर ब्लास्टर” अशी उपमा दिली. नियम, संयम आणि न्यायाच्या बळावर सचिन अहिर उपसभापतीपदाला नवी उंची देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिंदे म्हणाले की, सचिन अहिर हे अभ्यासू, अनुभवी आणि अष्टपैलू नेतृत्व असून राजकारण व समाजकारणातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर यांची तुलना करत त्यांनी, “एक सचिन क्रिकेटमधून निवृत्त झाला, तर दुसऱ्या सचिनने जबाबदारीचे पॅड बांधून नव्या डावाला सुरुवात केली आहे,” असे सांगितले.

२०१९ मध्ये शिवसेनेच्या उमेदवार म्हणून सचिन अहिर यांना मतदान केल्याची आठवण करून देत शिंदे म्हणाले की, नीलम गोरे यांच्यानंतर पुन्हा एक शिवसैनिक या घटनात्मक पदावर विराजमान होत असल्याचा आनंद आहे. त्यांनी माजी उपसभापती नीलम गोरे यांच्या कार्याचाही गौरव केला.

कामगार चळवळ, समाजकारण आणि जनसंपर्क या क्षेत्रातील सचिन अहिर यांच्या कार्याचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, त्यांनी कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला. संघटनांमधील नेतृत्व, समाजसेवा आणि सर्वसामान्यांशी कायम ठेवलेले नाते यामुळे त्यांना मोठा जनाधार मिळाला आहे.

उपसभापतीपदाच्या जबाबदारीचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, “या खुर्चीवर बसल्यानंतर पक्षापेक्षा नियम मोठे, भावनेपेक्षा परंपरा मोठी आणि आवाजापेक्षा संयम मोठा असतो.” सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही समान न्याय मिळाला पाहिजे, तसेच सभागृहात पक्ष नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आणि न्यायाची भूमिका दिसली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

भाषणात शिंदे यांनी शायरी आणि क्रिकेटच्या उदाहरणांद्वारे सचिन अहिर यांचे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार विकासाच्या दिशेने काम करत असल्याचे सांगत विरोधी पक्षाने विधायक सहकार्य करावे, असे आवाहनही केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत