शिरुर तालुक्यात रवी काळेंनी अशोक पवारांची साथ सोडल्याने राजकीय वातावरण तापले

मुख्य बातम्या राजकीय

शिरुर (तेजस फडके): अजित पवारांनी शरद पवारांविरूद्ध बंड करून सरकारमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडत आहे.. या घटनेचे पडसाद आता शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उमटले असून राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. आमदार ॲड.अशोक पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर शरद पवारांची साथ देण्याचे ठरवले. मात्र, अशोक पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. त्यामुळे आमदार अशोक पवारांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे शिरूरमध्ये मोठी खळबळ माजली असून कार्यकर्त्यामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

गेल्या दहा दिवसांत झालेल्या घडामोडींवर केलेल्या आत्मचिंतनातून अजितदादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे, असं रवीबापू काळे यांनी शिरूर येथे पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. अजित पवार यांच्या कामाची पद्धत आणि राजकारणातील रोखठोक भूमिका व तालुक्याच्या विकासातील भरीव योगदान विचारात घेऊन त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं बहुतांश जिल्हा परिषद सदस्य व तालुक्यातील जिल्हास्तरीय संस्थांचे सर्व प्रतिनिधी अजित पवारांबरोबर असल्याचा दावा काळे यांनी केला आहे

रवीबापू काळे नेमकं काय म्हणाले?

“पवार साहेबांना आम्ही दैवत मानतो. पण अजितदादांचे योगदानही महत्वाचे आहे. त्यामुळे या सर्व अनाकलनीय राजकीय घडामोडींनंतर माझ्यासह असंख्य कार्यकर्ते चिंतेत होते. पण आत्मचिंतनाच्या माध्यमातून आम्ही या संभ्रमातून मार्ग काढला आहे. अनेक नव्या-जून्या कार्यकर्त्यांशी साधलेल्या संवादातून अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे”, असं ते म्हणाले.

“अजित पवार यांची प्रशासनावर घट्ट पकड आहे. तालुक्यातील अनेक महत्वाच्या योजना त्यांच्यामुळेच पूर्णत्वास आल्या आहेत. माझ्यासारख्या असंख्य नवयुवकांना त्यांनीच घडविले. बहुसंख्य आमदार त्यांच्यासोबत असल्याने व त्यांच्या नेतृत्वाचा आपापल्या तालुक्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे आपण त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे”, असंही ते यावेळी म्हणाले.

आठ वर्षे राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून पक्षसंघनेत जीव लावून काम करताना कुठल्याच निवडणुकीत पक्षाला अपयश येऊ दिले नाही. आमदार पवार यांच्या विधानसभा निवडणुकीत मी जीवाचे रान केले. त्यांच्या कारखान्याच्या कारभरात माझ्या कुटूंबाचे मोठे योगदान आहे. गेले १४ वर्षे त्यांच्यासोबत काम करताना निष्ठेला कुठेही तडा जाऊ दिला नाही. त्यामुळे माझी भूमिका ही आमदार अशोक पवार यांच्या राजकीय भूमिकेशी प्रतारणा करणारी आहे, असं म्हणणं योग्य ठरणार नाही, असा खुलासाही काळे यांनी केला.

“आमदार अशोक पवार यांनी पवार साहेबांसोबत जाण्याची भूमिका घेतली असली तरी आम्हाला आमचा राजकीय मार्ग निवडण्याबाबत त्यांनी मोकळीक दिली होती. त्यांची भूमिका त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी हिताची असेल, तशीच आमची आमच्यासाठी हिताची आहे. सरकारच्या माध्यमातून अडचणीत असलेला घोडगंगा साखर कारखाना सुरळीत मार्गावर आणण्यासाठी मदत होऊ शकते. हे त्यांना पटवून दिले आहे”, असंही काळेंनी यावेळी स्पष्ट केले.