पुणे: पुण्यातील वाघोली परिसरात एक धक्कादायक रस्ते अपघात आणि त्यानंतरचा वाद समोर आला आहे. नगर रोडकडे जात असताना मर्सडीज आणि स्विफ्ट कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातानंतरचा प्रकार अधिकच गंभीर झाला. कारण स्विफ्ट गाडीतील चालकांनी मर्सडीज गाडीवर हल्ला चढवला. त्यानंतर लहान मुलासोबत धक्कादायक कृत्य केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर स्विफ्टमधील लोकांनी मर्सडीज गाडीची तोडफोड केली आणि त्यात मोठं नुकसान केलं. इतक्यावरच न थांबता, त्यांनी भरपाई मिळावी यासाठी मर्सडीज गाडीतील आठ वर्षांच्या चिमुकल्याला उचलून नेले. याशिवाय, गाडीत असलेल्या महिलांना देखील मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
या सर्व प्रकारामुळे परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कारवाई सुरू केली. सदर घटनेबाबत वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांवरून दोषींवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.