मोसंबी उत्पादकांना मिळणार दिलासा, येत्या ८ दिवसांत होणार नुकसानीचे पंचनामे…

महाराष्ट्र

जालना: जालना जिल्ह्यातील मोसंबी बागायतदारांच्या बुरशीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या ८ दिवसांत करण्याचे निर्देश नुकतेच जालना जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी दिले. यामुळे नुकसानग्रस्त मोसंबी बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार असून यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. विविध महत्त्वाच्या प्रश्नांबाबत जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली होती.

जालना जिल्ह्यातील बागायतदारांच्या मोसंबीवर गेल्या काही दिवसांमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करुन दानवे यांनी बागायतदारांना पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात येईल असा शब्द दिला होता. दानवे यांनी यासाठी सतत पाठपुरावा करुन बागायतदारांचा प्रश्न उपस्थित केल्याने त्यांना आता मदत मिळणार आहे.

अतिवृष्टीबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत नुकसानाची माहिती घेतली. शेतकऱ्यांना नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरमुळे पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांना अतिरीक्त विद्युत संच (DP) ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. जालन्यातील मुख्य रस्त्याचे काम येत्या 3 महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.

जालना वरुन खामगाव कडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग वनविभागाच्या कचाट्यात अडकला होता, अखेर तो प्रश्न सुटला असून राज्य सरकार कडून त्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच त्यावर कार्यवाही होईल अशी माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले, शिवसेना सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, सहसंपर्क़प्रमुख डॉ हिकमतराव उढान, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, जिल्हाप्रमुख ए जे बोराडे, मा. आमदार संतोष सांबरे, जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, न. प मुख्याधिकारी संतोष खांडेकर, जिल्हाकृषी अधीक्षक रणदिवे, महावितरण अधीक्षक अभियंता अ पि पठाण, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, नंदु दाभाडे, उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे, नगरसेवक चेतन कांबळे आदी या बैठकीला उपस्थित होते.