मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिराला पक्षाचे सुमारे ७०० ते ७५० प्रमुख नेते, निमंत्रित कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक आज राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना तटकरे यांनी पक्षाच्या आगामी कार्यक्रमांची माहिती दिली.
राज्यातील आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यावर मुख्य समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी वळसे पाटील समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. संबंधित जिल्ह्यांचे दौरे करून सहकाऱ्यांसोबत मर्यादित कालावधीत पक्षबांधणीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, बीएलओ आणि एसआयआरच्या कामकाजासाठी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांची प्रमुख समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या समवेत आमदार अनिल भाईदास पाटील यांची सहसमन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती संकलित करून पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार असून, अंमलबजावणीत काही त्रुटी राहिल्या असल्यास त्या दूर करण्यावर भर दिला जाणार आहे.
२७ सप्टेंबरच्या राज्यव्यापी शिबिराचा अजेंडा आणि विचारमंथनाची रूपरेषा लवकरच निश्चित केली जाणार असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले. राज्यातील तरुणाईपर्यंत पक्षाचा व्यापक कार्यक्रम पोहोचवण्यावर या शिबिरात विशेष भर दिला जाणार आहे.
“स्वर्गीय अजितदादा संपूर्ण तरुणाईचे लोकप्रिय नेते होते. त्यांचे विचार पुढे घेऊन जात असताना ते विचार पक्षाच्या अजेंड्यावर नक्कीच असतील,” असे सुनिल तटकरे यांनी सांगितले. त्यामुळे नाशिकमध्ये होणारे हे शिबिर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचे ठरणार आहे.