विखे कुटुंबातील नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत

महाराष्ट्र

काका राधाकृष्ण विखे पाटलांपासून दशकभर संपर्क नसल्याचा दावा

अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या विखे पाटील कुटुंबातील नीला विखे पाटील यांनी स्वीडनच्या राजकारणात महत्त्वाची मजल मारली आहे. ४१ वर्षीय नीला यांनी स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून स्वीडनच्या ३४९ सदस्यांच्या रिक्सदागमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा संसदीय कार्यकाळ २८ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणार असल्याची अधिकृत नोंद आहे.

नीला विखे पाटील या ग्रीन पार्टीच्या नेत्या असून त्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या कन्या आणि महाराष्ट्राचे माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आहेत. संसदेवर निवड झाल्यानंतर त्यांचे काका आणि महाराष्ट्राचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. ही संपूर्ण विखे पाटील कुटुंबासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले होते.

मात्र, त्यानंतर नीला यांनी पीटीआयशी बोलताना विखे पाटील कुटुंबाशी असलेल्या आपल्या सध्याच्या संबंधांबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांच्याशी गेल्या दशकभरापासून आपला नियमित संपर्क नसल्याचे नीला यांनी सांगितले.

नीला यांच्या म्हणण्यानुसार, सुजय विखे पाटील यांचा एक व्हिडीओ त्यांना पाठवण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये स्वीडनमध्ये विखे कुटुंबातील एक सदस्य खासदार झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. आपल्या राजकीय यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी म्हटले.

राधाकृष्ण विखे पाटील आणि आपली राजकीय भूमिका व विचारसरणी वेगळी असल्याचे नीला यांनी स्पष्ट केले. आपण ग्रीन पार्टीशी असलेली बांधिलकी कायम ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार म्हणून निवड झाल्यानंतर फोन करून आपले अभिनंदन केले होते, असे नीला यांनी सांगितले. मात्र, त्यापलीकडे काका राधाकृष्ण विखे पाटील किंवा चुलत भाऊ सुजय विखे पाटील यांच्याशी आपला नियमित संपर्क नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्वीडनमध्ये राजकीय सल्लागार म्हणून काम केल्यानंतर तसेच स्टॉकहोम सिटी कौन्सिलमध्ये जबाबदारी सांभाळल्यानंतर नीला विखे पाटील यांनी आता राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांच्या संसदेतील प्रवेशामुळे महाराष्ट्रातील विखे पाटील कुटुंबाचे नाव स्वीडनच्या राजकारणातही चर्चेत आले आहे; मात्र, कौटुंबिक नात्यांपेक्षा आपली स्वतंत्र राजकीय ओळख आणि ग्रीन पार्टीशी असलेली बांधिलकी महत्त्वाची असल्याचा संदेश नीला यांच्या वक्तव्यांतून स्पष्ट झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत