फक्त शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हाच ‘छत्रपती संभाजीनगर’ म्हणून ओळखला जाणार…

महाराष्ट्र

औरंगाबाद: मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावे बदलण्याची मागणी सुरू होती. काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला, त्यानंतर केंद्रानेही या नामांत्तराला मंजुरी दिली. पण, नामांतर फक्त शहरांचे झाले की जिल्ह्याचे? असा प्रश्न निर्माण झाला होता. आता मोठी माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडून याबाबत राजपत्र जारी करण्यात आले आहे. यामध्ये संपूर्ण जिल्हा आता छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव म्हणून ओळखला जाणार आहे.

औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे धाराशिव नामकरणाला मंजुरी दिल्यानंतर जिल्ह्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्याप्रमाणे आज औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजी नगर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव जिल्हा करण्यात आले आहे. राज्य सरकारने राजपत्र नोटिफिकेशन जारी केले आहे.

राज्य सरकारच्या नोटिफिकेशननुसार, आजपासून शहराप्रमाणेच या दोन्ही जिल्ह्यांची नावेही बदलण्यात आली आहेत. महसूल आणि वन विभागाकडून आज अधिकृत परिपत्रक काढण्यात आले. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 कलम 4 च्या पोट कलम (1) चे खंड सहा या अधिकाऱ्यांचा वापर करत जिल्ह्याचे नाव बदलण्यात आले आहे.