आपली मातृभाषा जतन करणं गरजेचं विभावरी देव याचं प्रतिपादन

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आपली मातृभाषा ही मराठीच असुन आपल्या मातृभाषेत आपण आपल्या भावना सहजरीत्या व्यक्त करु शकतो. आज जागतिक पातळीवर जरी इंग्रजी भाषा सर्वाधिक प्रमाणात बोलली जात असेल तरीही लहानपणी मुलांना किमान पाहिली ते चौथी पर्यंत मातृभाषेतुनच शिक्षण देण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या विभावरी देव यांनी व्यक्त केले.

मराठी राजभाषा दिनानिमित्त रामलिंग (ता. शिरुर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवार (दि 27) रोजी लेखक आणि कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात विभावरी देव प्रमुख पाहुण्या म्हणुन उपस्थित होत्या. यावेळी बोलताना शाळेतील शिक्षिका जयश्री मांजरे म्हणाल्या, मराठी भाषा हि संस्कृत आणि प्राकृत भाषेमधुन निर्माण झाली असुन संस्कृत हि मराठी भाषेची जननी आहे. लेखक आणि कवी वि वा शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांची जयंती मराठी राजभाषा दिन म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो.

यावेळी बोलताना उद्योजक शरद पवार म्हणाले, रांजणगाव MIDC त मोठया प्रमाणात मल्टीनॅशनल कंपन्या असुन या ठिकाणी अनेक कोरीयन कंपन्या आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना दुभाषकांची गरज पडते. आपली मातृभाषा जरी मराठी असेल तरी ग्रामीण भागातील मुलांनी इंग्रजी बरोबरच जर्मन, स्पॅनिश, कोरियन अशा विविध भाषा शिकल्या पाहिजेत.

रामलिंग महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले म्हणाल्या, ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत मुलांना 1 ली ते 4 थी पर्यंत जरी मराठीतुन मुलांना शिक्षण दिलं जात असेल तरीही 5 वी नंतर मुलांना सेमी इंग्रजी किंवा इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते. परंतु मराठी माध्यमाची मुले कुठेही कमी नाहीत. शेवटी रोजच्या व्यवहारात आपण सगळ्यांशी मराठीतूनच संवाद साधतो. यावेळी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक मराठी भाषा दिन निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी रमेश चव्हाण,यशवंत कर्डिले यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निबंध लेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी शिरुर ग्रामीणचे माजी आदर्श सरपंच नामदेव जाधव, माजी उपसरपंच यशवंत कर्डिले, रमेश चव्हाण,उद्योजक शरद पवार,आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, डॉ वैशाली साखरे, पत्रकार किरण पिंगळे, वैशाली बांगर, प्रिया बिरादार, सुजाता पाटील, मनीषा साठे, इसवे , जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका जयश्री मांजरे, उर्मिला, जगदाळे, उज्जला लाळले, सुनंदा हिंगे मनिषा सालकर, नीता वाबळे, शिक्षक गणेश रासकर आदी शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी कर्डिले तर आभार गणेश रासकर यांनी मानले.