रस्त्यांच्या कामात फक्त 25% प्रगती; मुंबईकरांना पुन्हा खड्ड्यांचा आणि गटाऱ्यांचा पावसाळा गिफ्ट

महाराष्ट्र

मुंबई: मुंबईतील तब्बल 2121 रस्त्यांपैकी फक्त 479 रस्त्यांचेच काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. म्हणजे उर्वरित 1600 हून अधिक रस्ते अजूनही अर्धवट अवस्थेत आहेत. संपूर्ण शहर खोदलेलं, धुळीत न्हालेलं आणि आता पावसाने चिखलात बुडण्याच्या उंबरठ्यावर आहे.

महापालिका आयुक्तांनी फेब्रुवारीत बैठक घेऊन 31 मे पर्यंत काम पूर्ण व्हावं, असं स्पष्ट आदेश दिला होता. मात्र या आदेशाची अक्षरशः पायमल्ली करण्यात आली आहे. महानगरपालिकेत सध्या प्रशासक राज आहे. कोणतीही जनतेकडून निवडून आलेली व्यक्ती सत्ता रचनेत नाही. ही संधी साधून कंत्राटदार, अधिकारी आणि दलालांचे सिंडिकेट तयार झाले आहे. या सिंडिकेटमध्ये कोण किती ‘मलई’ खातो, याचीच चढाओढ सुरू आहे. कामं थांबलेली, निधी वाटलेला आणि चिरीमिरी वाटप सुरू आहे. या भ्रष्ट कारभाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी थेट आयुक्तांना सवाल केला आहे.

आयुक्तांच्या आदेशांना डावलून कामे रखडवणाऱ्या कंत्राटदारांवर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की पुन्हा ‘स्मशान शांतता’ राखली जाणार

खड्ड्यांमध्ये जीव जात आहेत. वाहतूक कोंडीत रुग्ण अडकतात. चिखलाने शाळकरी मुलं घसरून पडतात. हे कोणत्या मुंबईचं चित्र आहे? ही ‘शांघाय’ मुंबई की ‘शमशान’ मुंबई.

मुंबईकर दर वर्षी सहन करतात, पण यंदा सहन करायचं नाही. आता प्रश्न आहे. “खरंच विकास होतोय का? की फक्त मलई वाटली जातेय.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून लवकरच महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे, आणि जर परिस्थितीमध्ये सुधारणा झाली नाही तर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येतील. मुंबईकरांसाठी आवाज उठवणं ही आमची जबाबदारी आहे.ती आम्ही निभावूच!

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार, मुंबईअध्यक्ष – ॲड. अमोल मातेले