नवी दिल्ली: खासदारांना मिळणारा पगार आणि विविध भत्त्यांचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. अनेकदा या विषयावर वेगवेगळ्या पक्षांतील खासदार पक्षभेद विसरून एकत्र येताना दिसतात. मात्र सध्याच्या लोकसभेत याला अपवाद ठरतील असे दोन खासदार आहेत. त्यांनी खासदार म्हणून मिळणारा पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिकारांतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार, सध्याच्या लोकसभेत केवळ दोन खासदारांनी आपला पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भाजपचे कुरुक्षेत्रचे खासदार नवीन जिंदाल आणि काँग्रेसचे इनर मणिपूरचे खासदार बिमोल अकोजाम यांचा समावेश आहे.
या दोन्ही खासदारांचे मतदारसंघही भौगोलिकदृष्ट्या खूप दूर आहेत. हरियाणातील कुरुक्षेत्र ते मणिपूरमधील इंफाळ या दोन मतदारसंघांमध्ये सुमारे २५७५ किलोमीटरचे अंतर आहे. विशेष म्हणजे, नवीन जिंदाल यांनी केवळ पगारच नाही तर खासदारांना मिळणारे सरकारी भत्ते आणि इतर सोयी-सुविधा देखील न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा सचिवालयाकडून आरटीआय अंतर्गत देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्याच्या लोकसभेतील ४८१ सदस्य नियमितपणे पगार घेत आहेत. लोकसभेत एकूण ५४३ जागा असून त्यापैकी दोन जागा सध्या रिक्त आहेत. पगार घेणाऱ्यांच्या यादीत नसलेल्या उर्वरित खासदारांची स्थिती मात्र या उत्तरात स्पष्ट करण्यात आलेली नाही.
आर्थिक पार्श्वभूमीच्या दृष्टीने या दोन्ही खासदारांमध्ये मोठा फरक आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार नवीन जिंदाल यांनी सुमारे १२४१ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे, तर बिमोल अकोइजाम यांनी सुमारे ९७ लाख रुपयांची मालमत्ता घोषित केली आहे.
लोकसभेतील सर्वात श्रीमंत खासदाराचा मान मात्र गुंटूरचे खासदार चंद्रशेखर पेम्मासानी यांच्याकडे आहे. त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात ५७०५ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जाहीर केली आहे. त्यांच्या पाठोपाठ चेवेल्लाचे खासदार कोंडा विशवेश्वर रेड्डी यांचा क्रमांक लागतो. त्यांच्या नावावर ४५६८ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता आहे.
आरटीआयमधून समोर आलेल्या या माहितीनंतर संसदेतील खासदारांच्या पगार आणि भत्त्यांबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता आहे.