परळी (जि. बीड): शहरातील अरुणोदय मार्केट परिसरात भर बाजारात एका तरुणावर टोळक्याने लोखंडी रॉड व पाईपने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी पाच जणांविरोधात परळी शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, Parli शहरातील अरुणोदय मार्केट परिसरात खरेदीसाठी आलेल्या युवकाला काही जणांनी अडवले. “तुला खूप मस्ती आली आहे, तू आमच्या विरोधात काम केलेस,” असे म्हणत आरोपींनी त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर संतापलेल्या टोळक्याने युवकाला शिवीगाळ करत लोखंडी रॉड आणि लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली.
ही घटना भर बाजारात घडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मारहाणीचा प्रकार पाहताच आसपासच्या नागरिकांनी धाव घेत जखमी युवकाची सुटका केली आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी शेख हशब, शेख हाफिज, शेख शोफुला, शेख साकेब आणि शेख आलिम या पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
निफाडमध्ये डॉक्टर दांपत्यावर हल्ला; हॉस्पिटलची तोडफोड
दरम्यान, निफाड तालुक्यातील सायखेडा येथे गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून डॉक्टर दांपत्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणात तिघा तरुणांनी डॉ. प्रशांत कांडेकर आणि डॉ. अश्विनी कांडेकर यांना मारहाण करत हॉस्पिटलची तोडफोड केल्याचा आरोप आहे.
या वेळी महिला डॉक्टरचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. इंटरनॅशनल महिला दिवस च्या दिवशीच ही घटना घडल्याने परिसरात संतापाची लाट उसळली. संतप्त ग्रामस्थांनी सायखेडा पोलीस स्टेशन येथे घेराव घालत रस्ता रोको आंदोलन केले.
पोलिसांनी या प्रकरणात आकाश जाधव, ऋतिक कापसे आणि साहिल पटेल या तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.