प्रबोध डावखरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: कै. वसंत डावखरे यांचे चिरंजीव प्रबोध डावखरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

कै. वसंत डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी मोठे योगदान दिले होते. अनेक वर्षे त्यांनी विधानपरिषदेचे सभापती म्हणून काम पाहिले. “अजातशत्रू” म्हणून त्यांची ओळख होती, असे सांगतानाच शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचे चिरंजीव प्रबोध डावखरे यांनी प्रवेश केला असल्याचे छगन भुजबळ यांनी नमूद केले.

प्रबोध डावखरे यांना पक्षात योग्य सन्मान आणि संधी मिळेल. तसेच संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील, असा विश्वासही छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते कै. वसंत डावखरे यांचे चिरंजीव प्रबोध डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते खासदार पार्थ पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षप्रवेश केला. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रबोध डावखरे यांनी, “वडिलांच्या काळात ठाण्यात राष्ट्रवादीचे जे वर्चस्व होते, ते पुन्हा निर्माण करण्यासाठी काम करणार,” असा निर्धार व्यक्त केला.

यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी प्रबोध डावखरे यांचे पक्षात स्वागत केले. “प्रबोध डावखरे पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी निश्चितच प्रभावीपणे काम करतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला संजय बनसोडे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार प्रतापराव चिखलीकर-पाटील, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, युवक नेते व प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत