नाझरेत दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण समारंभ उत्साहात

महाराष्ट्र

भोर (प्रतिनिधी): नाझरे (ता. भोर) येथे श्री दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण समारंभ विश्वचैतन्य परमपूज्य नारायण महाराज यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. शिवव्याख्याते सचिन शिवाजीराव देशमुख यांच्या व्याख्यानाने सोहळ्याची सुरुवात झाली. ह.भ.प. सायली महाराज देशमुख यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले. दरम्यान, विविध भागांतील कीर्तनकारांची समाजप्रबोधनपर कीर्तने झाली. यामुळे नाझरे परिसर भक्तिमय वातावरणात चिंब झाला होता.

बुधवारी (दि 3) रोजी सकाळी श्री दत्तमूर्ती व कलशाची ११ जोडप्यांच्या हस्ते पूजा, रुद्र अभिषेक करत विधी पूर्ण करण्यात आले. त्यानंतर दुपारी सद्गुरूंची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोलपथक, भजनी मंडळातील मुले व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये अर्धा तास मिरवणूक सुरू होती. मिरवणूक वाजतगाजत नव्या दत्तमंदिराच्या जवळ आल्यानंतर प्रथम श्री दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना सद्गुरू नारायण महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. मंदिराच्या शिखरावर कलशारोहण करण्यात आले. याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने सद्गुरू नारायण महाराज यांचा मानाची पगडी, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

श्रीक्षेत्र नारायणपूर येथील मंदिर व्यवस्थापक भरत क्षीरसागर व श्री दत्तमंदिर क्षेत्र नारायणपूरचे विश्वस्त प. पू. स्वामी पोपट महाराज यांचादेखील सत्कार करण्यात आला. यानंतर सद्गुरू नारायण महाराज यांनी ग्रामस्थांना व भाविकांना मार्गदर्शन व भजन करत सर्वांना शुभाशीर्वाद दिले. सद्गुरू नारायण महाराजांनी श्री दत्तगुरूंचे भजन करत सर्व परिसर मंत्रमुग्ध केला.

सर्व उपस्थित भाविकभक्त व ग्रामस्थ श्री दत्तगुरूंच्या आगमनाने आणि भजनाने चैतन्यमय होऊन गेले. यानंतर सर्व ग्रामस्थांच्या व शिष्य परिवाराच्या उपस्थितीत परमपूज्य पोपट महाराज स्वामी यांच्या हस्ते नवग्रहांचे होमहवन मंत्रांच्या उच्चाराने विधी पार पडले. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण, नवग्रह होमहवन झाल्यानंतर आलेला माहेरवाशीण लेकींच्या ओटी भरून युवकवीर ह.भ.प. माउली महाराज पठाडे यांच्या सुश्राव्य कीर्तनाने सोहळ्याची सांगता झाली.

गुढ्या उभारून सोहळा साजरा…

ढोलताशांच्या गजरात आणि हलगीच्या निनादात ग्रामस्थांच्या व परिसतील दत्त भक्तांच्या उपस्थितीत तीन दिवसांचा सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात आणि भव्यदिव्य मिरवणुकीने पार पडला. सोहळ्यानिमित्त संपूर्ण गावात गुढ्या उभारून सोहळा उत्साहात साजरा केला.