solapur cow

लक्ष्मी गायीने दिला तब्बल चार वासरांना जन्म; बघण्यासाठी गर्दी…

महाराष्ट्र

सोलापूर : एका गायीने तब्बल चार वासरांना जन्म दिल्याची घटना मोहोळ तालुक्यातील पापरी गावात घडली आहे. चारही वाससे आणि गाय अगदी ठणठणीत आहे. एकाच वेळी चार वासरांचा जन्म होणे ही दुर्मिळ गोष्ट मानली जात आहे. वासरांना बघण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

गणेश लोंढे असे गायीच्या मालकाचे नाव आहे. लोंढे यांनी 2017 ला मुंबईतील नोकरी सोडून गावात शेती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी लक्ष्मी नावाची ही गाय खरेदी केली होती. या गायीची आतापर्यंत चार वेळा प्रसूती झाली आहे. त्यात तिने पहिल्यांदा अशा पद्धतीने एकाच वेळी चार वासरांना जन्म दिल्याची घटना घडली आहे. ही गाय खऱ्या अर्थाने लक्ष्मी आहे, असे गणेश लोंढे म्हणाले.

गायीने जन्म दिलेल्या चार वासरांपैकी एक खोंड आणि तीन कालवडी आहेत. पहिल्यांदा गाईला खोंड झाले. त्यानंतर थोड्या थोड्या वेळाने गायीने तीन कालवडींना जन्म दिला. दरम्यान, आजपर्यंत आपण गाईला एक किंवा दोन वासरे झाल्याचे एकले किंवा बघितले असेल. पण मोहोळ तालुक्याच एकाच वेळी गायीने चार वारसांना जन्म दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या दुर्मिळ घटनेची चर्चा सध्या संपूर्ण मोहोळ तालुक्यात सुरु झाली आहे. या गाईला आणि वासरांना बघण्यासाठी नागरिक येत आहेत. शिवाय, सोशल मीडियावरून गाई आणि वासरांचे फोटो व्हायरल होत आहेत.