कोंढापुरीत शिष्यवृत्तीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान 

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कोंढापुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयता पहिलीची विद्यार्थिनी प्रणिती राहुल दिघे हिचा राज्यस्तरीय नॅशनल स्कॉलर सर्च शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक आल्यामुळे माजी सरपंच स्वप्निल गायकवाड यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. प्रणिती हिला 200 पैकी 196 गुण मिळाले आहेत. तसेच रुद्र जाधव व राजगुरू वाळके यांचाही 200 पैकी 190 गुण मिळवून राज्यात सहावा क्रमांक आला.

तसेच समर्थ सुनील धुमाळ याचा 196 गुण मिळवून राज्यात आठवा क्रमांक आला. तर स्वामिनी अजित सोळंके हिचा 184 गुण मिळवून राज्यात नववा क्रमांक आला. तेजस्विनी शत्रुघ्न दरवडे हिचा 182 गुण मिळवून राज्यात दहावा क्रमांक आला. एन एस एस ई राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सरपंच संदीप डोमाळे, उपसरपंच सुनील गायकवाड, माजी सरपंच स्वप्निल गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राहुल दिघे, धनंजय गायकवाड, राजाराम रासकर, भगवान गायकवाड, चंद्रकांत दिघे संतोष गायकवाड, महेंद्र घाडगे,संजय दोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यंदा प्रथमच इयता पहिलीची मुले शिष्यवृती तयारीसाठी या परिक्षेस बसली होती. २५ मुलांना २०० पैकी १५० जास्त गुण मिळाले. याप्रमाणे सर्वच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन तयारी करुन घेतली होती. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांनी विशेष बक्षीस देण्याचे जाहीर करुन मुख्याध्यापक सुदाम लंघे यांचे कौतूक केले.तर अनिल महाजन यांनी सर्वाचे आभार मानले.