ठाणे: अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाती निधनावरून आमदार रोहित पवार राजकारण करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी रोहित पवारांचे वर्तन “अत्यंत चुकीचे आणि घृणास्पद” असल्याचे म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेतली होती. अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताचे सत्य समोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन सीबीआयमार्फत चौकशीची मागणी करण्यात आली होती.
परांजपे म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी तांत्रिक बाबींचा अभ्यास करून आवश्यक ती कारवाई व गुन्हा नोंदवण्याबाबत आश्वासन दिले असतानाही रोहित पवार यांनी पुन्हा राजकीय हालचाली सुरू ठेवल्या. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही भेट घेतल्याचा उल्लेख करत, “मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्यानंतरही गुन्हा दाखल करण्याचे राजकारण थांबवावे,” असे आवाहन केले.
२ जुलै २०२३ रोजी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर अजितदादा पवार यांना कुटुंबाने एकटे पाडल्याचा आरोप करत परांजपे यांनी लोकसभा निवडणुकीतील वक्तव्यांची आठवण करून दिली. “विधानसभा निवडणुकीत ‘मला कुटुंबाने एकटे पाडले, पण बारामतीची जनता मला एकटे पाडणार नाही’ अशी भावना दादांनी व्यक्त केली होती. तो व्हिडिओ आजही सर्वांकडे उपलब्ध आहे,” असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय अधिवेशनातील जय पवार यांना मागील रांगेत बसविल्याचा आरोपही परांजपे यांनी फेटाळला. अधिवेशनाचे फेसबुक लाईव्ह सुरू असताना सूत्रसंचालकांनी जय पवार यांना पुढे बसण्याचे आवाहन केले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
“अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राजकारण करणे चुकीचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. महाराष्ट्रासमोर सत्य यावे, हीच सर्वांची अपेक्षा आहे,” असे परांजपे यांनी शेवटी नमूद केले.