‘पुणे–नाशिक रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; सत्यजीत तांबेंचे जनआंदोलनाचे रणशिंग’

महाराष्ट्र

मुंबई: पुणे–नाशिक सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठीचा लढा आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या प्रश्नावर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ९ ऑगस्ट (क्रांतीदिन) रोजी सकाळी ९ वाजता पुणे–नाशिक महामार्गावरील विविध ठिकाणी एकाच वेळी चक्काजाम जनआंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.

तांबे म्हणाले की, एका बाजूला केंद्र सरकारकडून हा रेल्वे प्रकल्प रद्द झाल्याचे सांगितले जात असले, तरी लाखो नागरिकांच्या अपेक्षा कायम आहेत. नफा-तोट्याचा विचार न करता जनतेच्या भविष्यासाठी हा प्रकल्प मंजूर करावा, अशी त्यांनी मागणी केली.

“हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे किंवा नेत्याचे नसून सामान्य नागरिकांचे आहे. रेल्वेसारखे प्रकल्प शंभर वर्षांत एकदाच उभे राहतात. आजची संधी गमावली तर पुढील अनेक पिढ्या या विकासापासून वंचित राहतील,” असे तांबे यांनी स्पष्ट केले.

पुणे–नाशिक दरम्यानचा प्रवास दिवसेंदिवस अधिक कष्टदायक होत असून, दोन-तीन तासांचा प्रवास सहा-सात तासांपर्यंत वाढल्याने नागरिक त्रस्त असल्याचे त्यांनी नमूद केले. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि वाढत्या प्रवासाच्या ताणामुळे हजारो विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक व व्यावसायिकांना मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले.

या रेल्वेमार्गामुळे सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर, चाकण यांसह संपूर्ण पट्ट्याच्या विकासाला चालना मिळेल. तसेच पुणे आणि नाशिक शहरांवरील वाहतुकीचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करत तांबे म्हणाले, “केंद्र सरकारला जागे करण्यासाठी आता जनतेनेच रस्त्यावर उतरले पाहिजे. इतिहास साक्षी आहे, जनता एकजूट झाली की सरकारला निर्णय घ्यावाच लागतो.”

“हे आंदोलन कोणत्याही पक्षासाठी किंवा व्यक्तीसाठी नसून भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सामान्य माणूस म्हणून या जनआंदोलनात सहभागी व्हावे,” असे आवाहनही त्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत