अर्थसंकल्प २०२५ सादर झाल्यानंतर मध्यमवर्गीय, महिला आणि आरोग्य क्षेत्राला दिलासा

महाराष्ट्र

पुणे: केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ सादर झाल्यानंतर राज्यभरात त्याची चर्चा रंगली असून, या बजेटमध्ये मध्यमवर्गीय, महिला आणि आरोग्य क्षेत्राला मोठा दिलासा देण्यात आल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले. त्या विश्व मराठी संमेलन २०२५ च्या कार्यक्रमात बोलत होत्या.

१२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त – सामान्य जनतेसाठी मोठा दिलासा

“या अर्थसंकल्पात १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आल्याने सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळेल. यामुळे मध्यमवर्गीयांना आर्थिक सुट मिळणार असून, विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या करदात्यांना याचा लाभ होईल” असेही याप्रसंगी डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

आरोग्य क्षेत्रावर भर– कॅन्सर आणि दुर्धर आजारांवरील औषधांच्या किंमती कमी होणार

पुढे बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, कॅन्सरसह अन्य दुर्धर आजारांवरील औषधांच्या किंमती कमी करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परदेशातून आयात होणाऱ्या औषधांबरोबरच देशांतर्गत उत्पादनांवरही सवलती देण्यात आल्या आहेत. यामुळे रुग्णांना परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध होतील.

महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधा- सरकारचा प्रगतीकडे भर

महिला बचत गटांसाठी सुरू असलेल्या ‘लखपती दीदी’सारख्या योजनांना अर्थसंकल्पात पाठिंबा मिळाल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. तसेच, महाराष्ट्रात शहरांचा चेहरा बदलत असून, दळणवळण आणि आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी सरकारने पायाभूत सुविधांवर भर दिला आहे. मुंबईतील अटल सेतू, मेट्रो प्रकल्प, समृद्धी महामार्ग यांसारख्या योजनांचा उल्लेख करत त्यांनी शहरांचा विकास वेगाने होत असल्याचे सांगितले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावरील टीका अयोग्य; डॉ. नीलम गोऱ्हे

डॉ. गोऱ्हे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणावर सोनिया गांधी यांनी केलेल्या टीकेवर नाराजी व्यक्त केली. “राष्ट्रपती आदिवासी समाजातील असून, त्यांच्याबद्दल अशा प्रकारची टीका करणे अयोग्य आहे,” असे त्या म्हणाल्या. अर्थसंकल्प २०२५ हा सर्वसमावेशक असून, त्याचा लाभ मध्यमवर्ग, महिला आणि आरोग्य क्षेत्राला होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.