फडणवीसांच्या गृहविभागावर सपकाळांचा निशाणा; वैजापूरबाहेरील अधिकारी आणि महिला अधिकाऱ्यांचा तपास पथकात समावेश करण्याची मागणी
मुंबई: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील मागासवर्गीय समाजातील तरुण रोहित पठारे याच्या हत्या प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील दलित व मागासवर्गीय समाज सुरक्षित नसल्याचा आरोप करत, रोहित पठारे हत्या प्रकरणाचा तपास सध्याच्या विशेष तपास पथकाकडून (SIT) काढून आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील नव्या एसआयटीमार्फत करावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे. या तपास पथकात वैजापूरबाहेरील अधिकारी तसेच महिला अधिकाऱ्यांचा समावेश करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी खासदार कल्याण काळे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण डोणगावकर, राजाभाऊ देशमुख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. रोहित पठारे याची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रमाणेच ही घटनाही विकृत मानसिकतेचे दर्शन घडवणारी आहे. मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अशा घटना घडत असताना राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे वास्तव समोर येत आहे.
राज्यात गुन्हेगारांना पोलिसांचे भय राहिलेले नाही. पोलिस यंत्रणा नेमके कोणाचे संरक्षण करत आहे, असा सवाल उपस्थित करत सपकाळ यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य असताना प्रत्यक्षातील घटनांवरून खलप्रवृत्तींचेच संरक्षण होत असल्याचे चित्र दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला.
स्थानिक पोलिसांच्या तपासावर कुटुंबीयांचे आक्षेप
रोहित पठारे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक झाली असली, तरी कुटुंबीयांनी दिलेली माहिती आणि स्थानिक पोलिसांनी केलेली कारवाई यामध्ये तफावत असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. घटनेच्या वेळी पोलिसांकडे तक्रार करूनही योग्य ती कारवाई करण्यात आली नाही, असा कुटुंबीयांचा आरोप आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या तपासावर पठारे कुटुंबीय समाधानी नसल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून तत्काळ आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र एसआयटी स्थापन करावी. या पथकात वैजापूरबाहेरील अधिकारी आणि महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. तसेच तपासातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींची माहिती पीडित कुटुंबाला द्यावी आणि त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करावे, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
रोहित पठारे हत्या प्रकरणाच्या तपासावरून आता राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी निष्पक्ष तपासाची मागणी जोर धरत आहे.