मुंबई: मुंबईतील गँगस्टर्स, गुन्हेगारांचा कर्दनकाळ असलेले एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक हे आज निवृत्त झाले आहेत. दया नायक हे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले. १९९५ साली दया नायक मुंबई पोलीस दलात भरती झाले होते. त्यानंतर आता सुमारे ३१ वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास थांबला. संघर्ष, वादग्रस्त वळणं आयुष्य दया नायक यांच्या वाट्याला आले. जेवढी प्रसिद्धी आली तेवढीच बदनामीही त्यांच्या वाट्याला आली. ९०च्या दशकात मुंबईतील गँगस्टर टोळी संपवण्यात दया नायक यांची भूमिका महत्वाची होती.
या नायक यांच्या नावावर ८६ एन्काउंटर आहेत. तर एक हजारांहून अधिक आरोपींना त्यांनी तुरुंगात पाठवले आहे. यामध्ये दाऊदच्या टोळीतील २२ गुंडांचा, राजन टोळीतील २० गुंडांचा समावेश आहे.लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (LTTE), लष्कर ए तैय्यबा यासारख्या प्रतिबंधक संघटनांशी संबंधित व्यक्तींचाही खात्मा नायक यांनी केला होता.
कंदहार विमान अपहरण प्रकरणातील दहशतवाद्यांशी संबधित तीन दहशतवाद्यांचा नायक यांनी एन्काउंटर केला होता. दहा महिन्यांपूर्वी ते एसीपी पदासाठी पात्र ठरले होते. निवृत्तीच्या दोन दिवस आधी त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती.
कोण आहेत दया नायक
१९९० च्या दशकात दया नायक यांना मुंबई पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख मिळाली होती. त्यांनी मुंबईतील ८६ गुंडांचा एन्काउंटर केलाय. कर्नाटकातील उडुपी येथे जन्मलेले दया नायक कोकणी भाषिक कुटुंबातील आहेत.
कन्नड माध्यमाच्या शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर, १९७९ मध्ये ते नोकरीच्या शोधात मुंबईला आले. येथे त्यांनी एका हॉटेलमध्ये काम करत असतानाच गोरेगावमधील महापालिकेच्या शाळेतून दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अंधेरीतील सीईएस कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.
दया नायक यांची पोलीस सेवेत ३१ वर्षांची कारकीर्द अखेर संपली.
९०च्या दशकातील गुन्हेगारीच्या काळात त्यांनी अनेक गँगस्टरचा खात्मा केला.
त्यांच्या कारकिर्दीत जितकी प्रसिद्धी मिळाली, तितकीच वादग्रस्तता देखील अनुभवली.
सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरून त्यांनी अधिकृत निवृत्ती घेतली.