संस्कार भारती आणि ओरायन मॉल तर्फे INS विक्रांतची प्रतिकृती चंद्रपूर वनस्पती उद्यानास अर्पण

महाराष्ट्र

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीमुळे घेतला निर्णय

मुंबई: संस्कार भारतीच्या संकल्पनेतून साकारलेली आणि पनवेलच्या ओरॉयन मॉल ने प्रायोजित केलेली आयएनएस विक्रांतची प्रतिकृती चंद्रपुरातील विसापूर येथील बॉटनिकल गार्डनमध्ये स्थापित करण्यात येणार आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार संस्कार भारती आणि ओरायन मॉल यांनी आयएनएस विक्रांतची ही प्रतिकृती विसापूर वनस्पती उद्यानास भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी याबद्दल संस्कार भारती आणि या दातृत्वासाठी ओरायन मॉल यांचे विशेष आभार मानले आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संस्कार भारती (कोकण प्रांत) यांच्या पुढाकाराने आयएनएस विक्रांतची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. पनवेलच्या ओरायन मॉल ने ही प्रतिकृती प्रायोजित केली आहे. आयएनएस विक्रांत ही भारताची पहिली संपूर्ण देशी बनावटीची विमानवाहू नौका असून त्यामुळे भारतीय नौसेनेच्या सागरी शक्तीत प्रचंड वाढ झाली आहे. (दि. 12) जानेवारी ते 19 जाने. या कालावधीत मंत्रालयातील त्रीमूर्ती प्रांगणात ही प्रतिकृती प्रदर्शित करण्यात आली होती. त्यानंतर ही प्रतिकृती पनवेलच्या ओरायन मॉल येथेही प्रदर्शित करण्यात आली होती.

राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित व्हावी, सैन्यदलांबाबत नागरिकांमध्ये जगरुकता निर्माण व्हावी तसेच आयएनएस विक्रांतची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी, या उदात्त हेतूने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही प्रतिकृती चंद्रपूर – विसापूरच्या वनस्पती उद्यानामध्ये ठेवण्याचा मनोदय व्यक्त केला होता. मुनगंटीवार यांच्या विनंतीला संस्कार भारतीचे दीपक करंजीकर, श्रीहरी कुलकर्णी आणि सुरेश चव्हाण तसेच ओरायन मॉलचे संचालक मंगेश परुळेकर यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. ओरायन मॉलच्या दातृत्वामुळे आता ही प्रतिकृती विसापूरच्या वनस्पती उद्यानात स्थापित करण्यात येईल. ही बाब चंद्रपूरच्या वैभवात आणि नावलौकिकातही निश्‍चितच नवी भर टाकणारी आहे.