मुंबई विद्यापीठाच्या एलएलबी निकालातील घोटाळ्यावर सत्यजीत तांबे आक्रमक

महाराष्ट्र

29 विद्यार्थ्यांना शून्य गुण देणाऱ्यांवर कारवाईची मागणी

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षांच्या एलएलबी अंतिम वर्षाच्या निकालात संपूर्ण उत्तरपत्रिका लिहूनही तब्बल २९ विद्यार्थ्यांना शून्य गुण देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुनर्तपासणीनंतर हेच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने उत्तरपत्रिका तपासणीतील गंभीर निष्काळजीपणा उघड झाला आहे. या प्रकरणावर आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

“विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासा, त्यांच्या भविष्याची परीक्षा घेऊ नका. शून्य गुण द्यायचेच असतील, तर अशा निष्काळजी आणि ढिसाळ व्यवस्थेलाच द्या,” अशा शब्दांत तांबे यांनी परीक्षा व्यवस्थेवर जोरदार टीका केली.

पुनर्तपासणीनंतर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असला, तरी प्रत्येक विद्यार्थ्याकडे पुनर्तपासणीसाठी वेळ, पैसे आणि मानसिक ताकद असतेच असे नाही. त्यामुळे चुकीच्या निकालामुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

गेल्या काही दिवसांतील पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ, निकालातील त्रुटी आणि आता उत्तरपत्रिका तपासणीतील हलगर्जीपणामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असल्याचे तांबे यांनी म्हटले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी व परीक्षकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली.

यासोबतच उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेचे स्वतंत्र आणि पारदर्शक ऑडिट करण्यात यावे, तसेच परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी असा हलगर्जीपणाचा खेळ पुन्हा होणार नाही, यासाठी सक्षम आणि जबाबदार परीक्षा व्यवस्था उभी करावी, अशी मागणीही आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत