लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे हृदयविकाराने निधन

महाराष्ट्र

पुणे: लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव शामराव कुंभार (वय ५०) यांचे शनिवारी मध्यरात्री दोन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने पुणे ग्रामीण पोलिस दलासह वाघोली–लोणीकंद परिसरात शोककळा पसरली आहे.

शनिवारी रात्री सुमारे १० वाजता ड्यूटी पूर्ण करून ते वडगावशेरी येथील निवासस्थानी परतले होते. मध्यरात्री त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे घोषित केले.

सर्जेराव कुंभार यांनी १२ ऑक्टोबर २०२४ रोजी लोणीकंद पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. पेरणेफाटा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या नियोजन व सुरक्षिततेची जबाबदारी त्यांनी सलग दोन वर्षे यशस्वीरीत्या सांभाळली होती.

नुकतेच वाघोली पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक युवराज हांडे हे सुट्टीवर असताना २५ ते २७ जानेवारीदरम्यान कुंभार यांच्याकडे वाघोली व लोणीकंद या दोन्ही पोलिस ठाण्यांचा अतिरिक्त कार्यभार होता. याच कालावधीत वाघोली परिसरात दोन खुनाच्या घटना घडल्या होत्या. या गंभीर घटनांतील आरोपींना त्यांनी तत्काळ अटक करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत प्रभावी कामगिरी बजावली होती.

उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना २०२५ मध्ये ‘सुरक्षित पुणे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अत्यंत शांत, संयमी व मितभाषी स्वभावाचे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. अधिकारी व कर्मचाऱ्यांशी ते नेहमी हसतमुखपणे वागत असल्याने सर्वांमध्ये ते लोकप्रिय होते.

मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चावरे येथील रहिवासी असलेल्या सर्जेराव कुंभार यांच्यावर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, मोठा भाऊ, पत्नी, मुलगा सिद्धेश व मुलगी सिद्धी असा परिवार आहे. मुलगा व मुलगी दोघेही शिक्षण घेत असून, मुलगी सिद्धी बीएएमएसचे शिक्षण घेत आहे.