टायमिंग चुकलं आणि डाव फिरला! शरद पवारांच्या हातातून सत्ता कशी निसटली

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: राजकारणात वेळेचं महत्त्व असतं आणि तोच वेळ चुकला, तर आखलेले डावही फसतात. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या सत्तासंघर्षात हेच चित्र पाहायला मिळालं. अजित पवारांच्या पश्चात पक्षाची सूत्रे शरद पवार पुन्हा हातात घेतील, अशी चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सत्ता समीकरणांनाच कलाटणी दिली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या निवासस्थान असलेल्या मुंबईतील सहयोग सोसायटीत शुक्रवारी अचानक हालचाली वाढल्या. अजित पवार गटातील नेत्यांना पक्ष पुन्हा शरद पवारांच्या ताब्यात जाण्याची भीती वाटत होती. त्यामुळे कोणताही विलंब न करता तातडीने नेतृत्व उभं करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातूनच सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे आलं.

मुंबईत रणनिती, बारामतीत हालचाली

मुंबईत प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत पुढील राजकीय रणनिती ठरल्याचं बोललं जातं. मात्र, माध्यमांसमोर प्रफुल्ल पटेल यांनी गटनेतेपदाबाबत निर्णय झालेला नसल्याचं सांगत शरद पवार गटाला हालचालींसाठी वेळ मिळू न देण्याची रणनीती अवलंबली.

दरम्यान, अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा तातडीने बारामतीला पोहोचले. त्यांनी सुनेत्रा पवार यांच्यासमोर नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवला. सुनेत्रा पवारांना बारामतीत अधिक वेळ थांबू न देता रातोरात मुंबईला रवाना करण्यात आलं.

देवगिरीवर ठिय्या, शपथविधी निश्चित

देवगिरीवर प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनी ठिय्या दिला होता. दुसरीकडे बारामतीची राजकीय फिल्डिंग पार्थ पवारांकडे सोपवण्यात आली होती. शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर पार्थ पवारांनी त्यांची भेट घेतली आणि दीड तास चर्चा केली. मात्र, तोपर्यंत सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं होतं.

शरद पवारांनी पत्रकार परिषदेत ‘अजितदादांची शेवटची इच्छा’ असा भावनिक सूर लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजकीय निर्णय आधीच घेतले गेले होते.

सुप्रिया सुळेंचा अखेरचा प्रयत्नही निष्फळ

अखेरचा प्रयत्न म्हणून सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या आई आशाताई पवारांची भेट घेतली. मात्र, या भेटीतून कोणताही निर्णायक पाठिंबा मिळाला नसल्याची चर्चा आहे. परिणामी, शुक्रवारी सकाळी शरद पवारांकडे झुकलेलं राजकारण शनिवारी दुपारी पूर्णतः हातातून निसटलं.

चुकलेलं टायमिंग ठरलं निर्णायक

या संपूर्ण घटनाक्रमातून एक बाब स्पष्ट झाली आहे—राजकारणात अनुभव महत्त्वाचा असला, तरी योग्य वेळी घेतलेला निर्णयच सत्ता ठरवतो. शरद पवारांच्या बाबतीत यावेळी तेच टायमिंग निर्णायक ठरल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.