तुमच्या भागातील लाईट गेल्यास या नंबरवर द्या मिसकॉल…

महाराष्ट्र

संभाजीनगर: महाराष्ट्रातल्या महावितरणच्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. तुमच्या भागात कुठल्याही कारणाने वीजपुरवठा खंडित झाला असेल, तर फक्त एका मिस् कॉलवर तक्रार नोंदवून विशेष म्हणजे त्यानंतर लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत होणार आहे. महावितरणने त्यासाठी मोबाइल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. टोल फ्री क्रमांक, महावितरणचे ॲप आणि संकेत स्थळावरून सुद्धा तक्रार नोंदवता येणार आहे.

या नंबरवर द्या मिस् कॉल

ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित झाल्याची मिस कॉलद्वारे तक्रार करण्यासाठी 022-50897100 हा क्रमांक असून महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

अशी करा तक्रार

ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी मोबाईलवर MREG टाईप करून त्यानंतर स्पेस देऊन आपला बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करावा आणि 9930399303 या क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठवावा. ग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावरील कंज्युमर पोर्टल, महावितरणचे मोबाईल ॲपवरही नोंदणी करता येईल. तसेच 1912, 1800-212-3435, 1800-233-3435 या टोल-फ्री क्रमांकांवर मोबाईल क्रमांक नोंदवता येतो.

येथे करा तक्रार

टोल फ्री क्रमांक: 1912, 1800-212-3435, 1800-233-343

मिस कॉल: 022-50897100 (केवळ नोंदणीकृत मोबाईलवरून)

एसएमएस: 9930399303 क्रमांकावर NOPOWER <स्पेस> <बारा अंकी ग्राहक क्रमांक> हा संदेश पाठवा

महावितरणचे मोबाईल ॲप

महावितरणचे ग्राहकांना आवाहन

पावसाळ्यामध्ये वादळवाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यावर ग्राहकांनी 15 ते 20‍ ‍मिनिटे वाट पाहूनच महावितरणला माहिती द्यावी. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी तातडीने धाव घेतात. संबं‍धित अभियंते व कर्मचाऱ्यांना वारंवार फोन केल्यास त्यांच्या कामात व्यत्यय येण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना फोन करण्याऐवजी टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप, एसएमएस किंवा मिस कॉल सुविधेचा वापर करावा; जेणेकरून महावितरण कर्मचाऱ्यांना काम करणे सुलभ होईल आणि वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करता येईल.