…तर सन्मान लढून मिळवावा लागेल; शीतल करदेकर

महाराष्ट्र

सुनो द्राैपदी ! शस्त्र उठालो,अब गोविंद ना आएगे, छोड़ो मेहंदी खड्ग संभालो,खुद ही अपना चीर बचा लो, द्यूत बिछाए बैठे शकुनि,…मस्तक सब बिक जाएंगे, सुनो द्राैपदी! शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे, कब तक आस लगाओगी तुम, बिक़े हुए अखबारों से, कैसी रक्षा मांग रही हो, दुःशासन दरबारों से, स्वयं जो लज्जाहीन पड़े हैंवे क्या लाज बचाएंगे, सुनो द्राैपदी! शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे, ही पुष्पमित्र उपाध्याय यांची  ही कविता नेहमीच चर्चेत राहिली आहे. कुस्तीगीर महिलांची लढाई अजून संपलेली नाही, त्यातील एका कुस्तीगीर महिलेने ही कविता ट्विटरवर टाकून आपली व्यथा व्यक्त केलेली आहे.

खर तर महाभारतामध्ये द्रौपदी चे वस्त्रहरण होऊ नये म्हणून तिच्या हाकेला धावणारा श्रीकृष्ण हा नेहमीच वंदनीय बंधू आणि आपला सखा असं प्रत्येक स्त्री मानते. कारण महाभारतातील युद्धामध्ये जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येईल तेव्हा तेव्हा मी  येईन असं भगवंताने सांगितलं होतं असं वाचनात आलेले आहे. वर्तमानात परिस्थितीत  महिलाच काय तर पुरुषांनाही या सख्याला हाक मारण्याची वेळ वारंवार येत असावी ,कारण परिस्थिती तशी कठीण आहे. या पक्षातून त्या पक्षात जाणारे संधीसाधू ,स्वार्थी मंडळी पाहताना मनात विचार येतो की,यांच्या हाकेला हा कृष्ण सखा कधी धावून येईल काय ? तर त्याचे उत्तर नाही असंच द्यावं लागेल.

आपण नेहमी म्हणतो की, सत्याचा विजय होतो मात्र त्याआधी सत्याला अनेक प्रकारे त्रास सहन करावा लागतो असंच काहीसं चित्र दिसून येत आहे. फक्त राजकारणातच नाही तर सर्व क्षेत्रांमध्ये चांगुलपणा मार खाताना दिसतो आणि चांगुलपणाचा बुरखा पांघरणारे मजेत जगताना दिसतात. काल सर्वत्र पितृदिन साजरा केला गेला, घरातला करतापुरूष  जन्मदाता पिता आपला आधार असतो, का तर हा बापमाणूस आपल्या वेदना संवेदना ओळखून आपल्यापाठी ठाम उभा राहत असतो, त्याचा आपल्या डोक्यावर हात असतो आणि म्हणूनच घराबाहेर पडताना आणि जगताना तो आधार आपल्या मनात असतो.

आज माननीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रकर्षाने आठवण येते ती यासाठी की, मुंबईमध्ये महाराष्ट्रात आम्हा लेकीना आधार वाटावा असा हा ‘बापमाणूस’ होता. त्यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन ज्या प्रकारे साजरा होतोय ते पाहताना मनाला निश्चितच वेदना होतात ! दोन गटात विभागली गेलेली शिवसेना हा आता अंतर्गत विषय राहिला नसून सर्व समाजाचा विषय बनला आहे!  त्याच अधिकाराने लिहितेय मी. मा .उद्धव  बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे त्यांच्या पित्याचा वारसा आणि आशीर्वाद आहे मात्र बाळासाहेबांप्रमाणे सर्वांचं ऐकण्याची आणि संघटन बळकट करण्याची क्षमता तशी कमीच आहे! आदित्य ठाकरे सुशिक्षित तरुण नेता म्हणून सर्वप्रिय आहेत.

मात्र शिवसेनेत असलेल्या अनुभवी महिला कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवण्यासाठी जी मानसिक पाठबळाची गरज आहे तिची कमतरता निश्चितच जाणवते! युवा नेतृत्व पूर्वीच्या शिवसेनेपेक्षा वेगळे आहे ते मैदानात उतरेल त्यावेळेला मोठ्या संख्येने असणाऱ्या शिवसेनेच्या रणरागिणींची ताकद त्यांच्यासोबत असण्याची गरज आहे. खर तर शिवसेनेची ताकद या रणरागिणी आहे, त्यातही हेवेदावे गटतट आहेतच, मात्र त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे शिवसेना ज्यांच्या रक्तात आहे अशा भगिनींची संख्या मोठी आहे. दुसऱ्या पक्षातून स्वार्थासाठी आलेले लोक शिवसेना सोडून गेले तर वाईट वाटण्याचं कारण नाही आणि शिवसेनेतून पोटभरून स्वार्थासाठी बाहेर पडले म्हणूनही वाईट वाटण्याचं कारण नाही! मात्र त्याचवेळी वर्तमान स्थितीत शिवसेना केवळ  मेळावे सभा यात न दिसता ती या स्त्री शक्तीच्या घरोघरी पोहोचण्याच्या ताकदीतून दिसण्याची गरज आहे ,त्यांना मानसिक पाठबळाची गरज आहे.

शिवसेनेत वर्तमानात भाकरी फिरवण्याची गरज नाही, कारण सध्या समुद्रमंथन सुरू आहे, जे होण्याची गरज होती. आपल्या पक्षातील कानाला लागणारे, खोटं सांगणारे आणि आपल्या खऱ्या शिवसैनिकांच्या हिताआड येणारे लोक थोडे बाजूला करून, वरचा कचरा साफ करून या तळागाळातील माता-भगिनींना आधार देण्याची गरज आहे. खरतर या रणरागीणीना लढायचं माहिती आहे मात्र कोणत्या पद्धतीने लढायचं ,कुठले विषय उचलायचे, कशाप्रकारे पक्षाचा प्रचार करायचा लोकांपर्यंत कसा न्यायचा या प्रशिक्षणाची कमतरता आहे! तसे प्रशिक्षण जर दिले गेले आणि आपल्यातील मधल्या फळीच्या महिलांना यासाठी पुढे केले तर खूप काही घडू शकते.

माननीय उद्धवजी आपणास एक विनंती की, खरंतर मानसिक वस्त्रहरण अपमान आणि योग्यतेची योग्य वेळी कदर  न होणे,संधी न मिळणे हे सुद्धा मानसिक खच्चीकरण असतं आणि आपल्या लढाऊ पक्षांमध्ये ते मोठ्या प्रमाणावर होत आहे, त्याकडे आपण पाहण्याची गरज आहे! आगामी निवडणूकच नाही तर पक्ष बळकटीसाठी या रणरागिनींना आपल्या आधाराची आणि पाठबळाची गरज आहे. पक्षातील वरिष्ठ पातळीवर काही अपवाद वगळता जे कोणी दगड आहेत आणि कान खाणारे आहेत त्यांना थोडा विश्राम देऊन गुणीजनाना साथ देण्याची गरज आहे. मला विश्वास आहे की , हा सन्मान त्यांना मिळाला तर त्या मोठ्या निष्ठेने आणि ताकदीने जनतेसाठी काम करतील. आपल्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्याबाबत जो प्रकार घडला तो खरच अत्यंत निंदनीय असा होता, मागे ठाण्याला घडलेला प्रकारही तसाच चिंताजनक होता.

आपल्या सोबत असणाऱ्या सैनिकांनी आपल्या सोबत सक्षम राहण्यासाठी त्यांचं मानसिक वस्त्रहरण होऊ द्यायचं नसेल तर त्यांच्यासाठी गरजेचा असणारा मानसिक  आधार आपण द्याल अशी खात्री आहे. आज समाजात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढताना दिसते ,मात्र त्यावर तातडीने ठामपणे काम करणाऱ्या रस्त्यावर उतरून मदत करणाऱ्या रणरागिणींची कमतरता आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम ताई गोऱ्हे असे विषय त्यांच्या पातळीवर चांगल्या प्रकारे सोडवतात!  त्यांचे साथीला   समाजहितासाठी काम करणाऱ्या माता-भगिनींची !गरज आहे.

ती गरज पक्षभेद बाजूला करून सर्वच महिला कार्यकर्त्या पुढे येऊन पूर्ण करतील असा विश्वास वाटण्याचा आधार असणारे एकमेव नेतृत्व म्हणजे ‘बापमाणूस’ आदरणीय शरद पवार साहेब !त्यांच्या साथीने आम्हा भगिनीचे भाऊ म्हणून आपण उभे राहाल, इतर पक्षातील किमान संवेदनशील असणारे नेते आपापल्या जागी माता-भगिनींच्या सन्मानासाठी सहकार्य करतील तर कुणाही भगिनीवर ‘श्री गोविंदाची” वाट पाहण्याची वेळ येणार नाही. आमची नम्र विनंती की राज्यकर्ते कोणीही असो पण स्त्रीसन्मानासाठी काम करण्याची तयारी प्रत्येकाची असली पाहिजे आणि ती नसेल तर नारीशक्ती आपापल्या ताकदीने आपल्या सन्मानासाठी  आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही.