mother love child

प्रिय अंजनी आई…तुझ्याशिवाय जगणं पोरक झालंय ग आई… या लेकराची साद ऐकून धावत….ये ग आई

मुख्य बातम्या शिरूर तालुका

आई म्हणोनी कोणास हाक मारी…ती हाक येइ कानी…मज होय शोककारी

शिरुर (तेजस फडके): प्रिय अंजनी आई…तू परत ये…मी आणि दादा तुझ्याशिवाय राहू शकत नाही. खूप खूप आठवण येतेय ग आई…डोळे भरुन येतात पण डोळे पुसणारे…मायेने गालावरून हात फिरवत उचलून घेत समजवणारे, हृदयाशी कवटाळून घट्ट मिठी मारणारी आई कुठे आहेस ग आई…मी जर तुला न सांगता खेळायला गेले तर किती रागवायची तू आई…पण आता किती दिवस झाले तू न सांगता गेलीस…मी कुणावर रागावू ग आई… कुणाला माझ्या आवडीचा खाऊ मागू…तू बनवलेला गरम गरम शिरा आता मला कोण भरवणार चिऊ काऊ चा घास म्हणून… माझ्या बोबड्या बोलांना कोण समजून घेणार…सांगना ए आई अग कुठे आहेस तू …मोठी माणसे म्हणतात आई देवाघरी गेली…पण आई देवाला मी दररोज सांगतेय मझ्या मम्माला परत पाठव मला बाकी काही नको.

या एवढ्या मोठ्या जगात तू आम्हाला सोडून का गेलीस…? दादा आणि माझी शाळा सुरु झाली. तेव्हा मला तुझी खुप आठवण आली. मी खूप रडले दादा मला समजावत होता. पण तोही रडत हमसून हमसून रडत होता. मग आम्ही दोघं बहीण भाऊ एकमेकांच्या गळ्यात पडून रडलो. पण आई आमचे डोळे पुसायला तू नव्हती… काय उपयोग ग त्या रडण्याचा, रुसण्याचा ज्याला समजून घेणारी आणि समजवणारी तू नाही आमचे अश्रू पुसण्यासाठी तुझा हात नाही की मायेचा पदर नाही… सांग ना ग आई या पाणावलेल्या डोळ्याला तेव्हढाही अधिकार नाही का ग…. अश्रूही आमच्यासारखे पोरके झालेत..

आई तू गेल्यापासून आम्ही खूप शांत असतो कोणाला काही बोलत नाही, कसलाही हट्ट करत नाही. सकाळी सकाळी उठवायला तू यायची, ब्रश करुन द्यायची. छान आवरायची आणि आवडता नाश्ता द्यायची. पण आई आता तू सकाळी सकाळी दिसत नाही…तुझा आवाज ऐकायला मिळत नाही. तुझी तगमग गडबड आता दिसत नाही…कारण आई तू आम्हाला दिसत नाही…तुझ्या गळ्याशी घट्ट मिठी आता मारता येत नाही…आई पुर येऊन गेल्यावर गाव शिवार जस उध्वस्त होत ना…अगदी तसाच आमच झालय ग…आयुष्याचा चिखल झाला ग आई…

मम्मा अग काल शाळा सुरु झाली मुलींनी नवीन ड्रेस घेतले होते. नवीन दप्तर आणले होते, मुलींच्या आईने त्यांची छानशी वेणी घातली होती, कुणी गजरा, कुणी गुलाब फुल लावले होते. माझ्या मैत्रिणी शाळेत खूप छान आवरून आल्या होत्या. त्यांच्या आईने त्यांच्यासाठी पहाटे उठून आवडीने करुन दिलेल्या आवडत्या पदार्थांचा डबा आणला होता. खूप छान वाटत होत पण आई तू नसल्याने माझी वेणी कोण घालेल ग… डोळ्यात काजळ कोण लावेल ग…माझ गंध पावडर कोण करील ग…गालावर दृष्ट लागू नये म्हणून कोण काजळाची टिक कोण लावेल ग…माझ कोण आवरुन देईल ग…खरच सांग आई आम्ही तुला कुठे शोधू आणि या छोट्या छोट्या आनंदात आमच्यासोबत तुझ्यासारखं कोण कस असू शकेल. तुझी जागा कोणालाच घेत येणार नाही ग मम्मी…सगळं जग गजबजलेलं असताना आम्ही मात्र पोरके आहोत…तुझ्या आठवणीत डोळे रडून रडून सुकून गेले मायेच्या ओलाव्याने डोळे पुसणारा ममत्वाचा हात असतानाही, गालाची गोड पि घेणारी आई कुठे आहेस ग…

आई शाळेतून घरी येईपर्यंत बसची कोण आतुरतेने वाट पाहील घरी आल्यावर मला पोटाशी कोण घट्ट धरेल…माझ्यासाठी बनवलेला गोड खाऊ कोण घालील…या उष्ट्या मुखाचा कोण बर गोड पापा घेईल…माझ्या मागे खोटं खोटं रागावून कोण धावेल… आई सायंकाळी तुळशीची सांजवात कोण लावेल आमच्याकडुन कोण शुभंकरोती म्हणायला कोण लावेल…भरलेल्या डोळ्यांनी तुला कुठ शोधू आई…

आई…दादा मला खूप समजावत असतो…पण आम्हाला दोघांना समजून घेणारी तू कुठे आहेस. घरातली कोणतीही छोट्यातली छोटी वस्तू अगदी जागेवर असावी म्हणून तू शिस्त लावायची,रागवायची पण आई इथ अख्खं आयुष्यच विस्कळीत झालंय काहीच कळत नाही. हे अस्ताव्यस्त आयुष्य कस सावरेल कसं आवरेल…आई तू असली की मी कशाला कशाला घाबरायची नाही…पण आई तू नाहीस तर मझ मन कशातच लागत नाही.

आई शाळेतून आल्यावर मला खूप वाईट वाटलं पण माझा रडवेला चेहरा पाहून दादा आणि घरातले सगळेच रडले…पण सगळ्यांना समजणारी आधार देणारी आणि डोळे पुसणारी आई तू नव्हती…आणि आमच्या रडण्याला काही अर्थ तरी आहे का ग मम्मा…रोज रात्री झोपताना तुझी खूप आठवण येते…तू छान कुशीत घेऊन झोपायची…मला आवडणारी गोष्ट सांगायची…पाठीवर थोपटत थोपटत मला झोपी लावायची… आता गोष्ट नाही की… तुझी कुस नाही की…पाठीवर मायेने थोपटणारा तुझा हात कधी मिळेल की नाही सांगता येत नाही…आई कुठे आहेस तू सांग ना वात्सल्य सिंधू आई…

आई तू सोडून गेल्यावर आम्हाला काहीच कळत नव्हते आपल्या शेजारी असणाऱ्या काकांच्या घरी खूप गायी आहेत मला तिथं घरच्यांनी नेले. मला खूप काऊ आवडते ना म्हणून पण आई संध्याकाळी ती काऊ आपल्या वासराला चाटत होती. त्याला दुध पाजत होती. तिथच झाडावरची चिऊ ताई आपल्या पिलाला इवल्याशा चोचीत घास भरवत होती मला तू आठवली ग आई… मी किती त्रास द्यायचे ना तुला जेवू घालताना आता मला कोण भरविल ग आई सांग ना मी कोणाला त्रास देऊ जेवू घालताना…सांग ना आई

अस म्हणतात देव बाप्पा लहान मुलांचं ऐकतो…देव बाप्पा हीच आई आम्हाला पुन्हा दे पण एक कर…तिला आमच्याशिवाय कोणावर जीव लावू देऊ नको…जगात खोटं खोटं बोलून फसवणाऱ्या माणसापासून सावध कस राहायचं हे तू शिकवून पाठव ..आणि हो बाप्पा अशा वाईट लोकांना चांगल्या आईच्या आयुष्यात येऊच देऊ नको…बाप्पा ज्यावेळी प्रेमाची, जीव लावण्याची शिक्षा कोणत्याही आईला स्वतःला करुन घ्यायची असेल ना त्यावेळी तू सांग या खोटारड्या प्रेमापेक्षा तुझी लेकर खूप मोठी आहेत.त्यांच्या आयुष्यात तुझी गरज आहे. बाप्पा खोटं बोलून, फसवून प्रेम करणारी माणसं चांगल्या, निर्मळ, निरपेक्ष प्रेम करणाऱ्यांच्या आयुष्यात येऊच देऊ नको…आणि बाप्पा ज्यांना वाटत ना आपल्याला या खोट्यारड्याने फसवले…आपल्या आयुष्याचा तमाशा केलाय, जगण्याचा नरक केलाय त्यांना सांग तू आधी एक आई आहेस तू लेकरांची माय आहेस…दुधावरची साय आहेस आणि लेकरांच्या आयुष्याचा आधार आहेस…

मी सर्व माझ्या दीदी, ताई, मावशी आणि प्रतिरुप आई यांना विनंती करतेय आकर्षणाच्या बाजारात खोट्या प्रेमाचा मुखवटा चढवणाऱ्या वासनांध, लबाड, फक्त शरीरावर प्रेम करणाऱ्या आणि निच प्रवृत्तीच्या माणसांपासून सावध राहा…लबाड लांडगे तुमची शिकार करण्यासाठी टपून बसले आहेत. तुमच्या दुःखाशी, तुमच्या स्वप्नांशी, तुमच्या आत्मसन्मानाशी यांना काही देणं घेणं नाही. तुम्ही या खोटारड्या वासनांध लोकांपासून सावध रहा…मी आज जे भोगतेय त्यात माझी व माझ्या भावाची चूक काय आहे.माझ्या आईची काय चूक होती…खर प्रेम करणे हा गुन्हा आहे काय…? आम्हाला आज आईच्या मायेचा घास, तिच्या प्रेमाची, मिठीची कोण जागा घेऊ शकेल का ??? जगातली कोणती गोष्ट आहे जी आईची जागा घेईल…स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी…

आम्ही तर पोरके झालो…तुम्ही सावध रहा लबाड लांडग्यांपासून…नाहीतर ते तुमची शिकार करतील…प्रेयसी म्हणून हरलात तरी चालेल पण आई म्हणून तुम्हाला जगायला हवे तसेच जिंकायलाही हवं…

आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी

ती हाक येइ कानी । मज होय शोककारी

आम्हास नाहि आई

ते बोल येति कानी । आम्हास नाहि आई

आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे

माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे

गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे

नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे

वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे

वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे

गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला

साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला

आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला

या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला

पंचारती जनांची । ना तोषवी मनाला

परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेला

येशील तू घराला । परतून केधवा गे !

दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे

हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे

कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे

रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे

ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे

(क्रमश:)