मुंबई: मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते अरुण सरनाईक यांच्या जीवनावर आधारित ‘पप्पा सांगा कुणाचे…’ या माहितीपटाचे विशेष प्रदर्शन प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली.
यावेळी अरुण सरनाईक यांची कन्या व माहितीपटाच्या निर्मात्या डॉ. सविता सरनाईक-नाईकनवरे, दिग्दर्शक डॉ. संतोष पाठारे, संकलक सौरभ नाईक, विशाखा देशपांडे, संहिता पाठारे तसेच सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रुती सडोलीकर काटकर उपस्थित होत्या. महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची प्रस्तावना केली व प्रेक्षकांशी संवाद साधला.
स्व. अरुण सरनाईक हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेते व गायक म्हणून ओळखले जात. त्यांच्या कारकिर्दीतील विविध पैलू, कलात्मक प्रवास आणि वैयक्तिक आठवणींचा भावस्पर्शी मागोवा या माहितीपटातून घेण्यात आला आहे.
डॉ. सविता सरनाईक-नाईकनवरे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी माहितीपटाची निर्मिती केल्याचे सांगितले. दिग्दर्शक डॉ. संतोष पाठारे यांनी निर्मिती प्रक्रियेतील अनुभव कथन केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रुती सडोलीकर यांनी अरुण सरनाईक यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कलाविश्वाचा गौरव केला. उपस्थित प्रेक्षकांनीही माहितीपटाचे उत्स्फूर्त कौतुक केले.