पावसाळ्यात तोडक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करा; आमदार अस्लम शेख

महाराष्ट्र

मुंबई: मुंबईसह ७ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केलेला आहे. राज्यात इर्शारवाडीसारखी दुर्देवी घटना घडलेली असताना मालवणी, अंबोजवाडीमध्ये भर पावसात २५० पेक्षा जास्त बांधकामं तोडली गेली. काल विधानसभा सभागृहात या मुद्द्यावरुन आक्रमक भूमीका घेत भर पावसात लोकांची घरे तोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी मालाड-पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी घेतली आहे.

अस्लम शेख म्हणाले, पावसाळ्यात कोणाचीही घरे तोडू नयेत असे मा. उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. महाराष्ट्र सरकारचाही स्वत:चा असा शासन आदेश आहे. असे असताना असं अचानक नेमकं काय घडलं की प्रशासनावर भर पावसात घरे तोडण्याची वेळ आली. भर पावसात तोडक कारवाई केल्यानंतर दोन मुलं आज रुग्णालयात जीवन मृत्यूशी झुंज देत आहेत. पोलीस प्रशासन, महानगरपालिका किंवा जिल्हाधिकारी असो सर्व यंत्रणांना उच्च न्यायालयाचा व सरकारचा आदेश लागू होतो. त्यामुळे भर पावसात घरे तोडणाऱ्या या अधिकाऱ्यांची संपूर्ण चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन झालेच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका शेख यांनी घेतली.

यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पावसाळ्यात कधीच अशा प्रकारची तोडक कारवाई केली जात नाही, अशा प्रकारची तोडक कारवाई का झाली याबाबत माहिती घेऊन संबंधितांना योग्य त्या सूचना देण्याची ग्वाही त्यांनी दिली.