बारामतीत स्ट्रॉबेरीचा गोड प्रयोग! निंबुतच्या दीपक जगताप यांचा १० गुंठ्यात लाखोंचा नफा

महाराष्ट्र

बारामती: बारामती तालुका म्हटले की उसाची हिरवीगार शेती डोळ्यांसमोर उभी राहते. मात्र बारामती तालुक्यातील निंबुत गावात एका प्रयोगशील शेतकऱ्याने पारंपरिक चौकटी मोडत थंड प्रदेशातील स्ट्रॉबेरीचे यशस्वी उत्पादन घेत नवा आदर्श निर्माण केला आहे.

दीपक जगताप यांनी विज्ञानाधारित नियोजन, हवामान व्यवस्थापन आणि अचूक निरीक्षण यांच्या जोरावर हा प्रयोग फळाला आणला.

परंपरेपलीकडचा विचार, प्रयोगशीलतेची वाट

दीपक जगताप यांना अंजीर शेतीचा तब्बल १७ ते १८ वर्षांचा अनुभव आहे. सुमारे सात एकर क्षेत्रावर त्यांनी अंजीर बाग विकसित केली आहे. पिकाचे सूक्ष्म निरीक्षण आणि काटेकोर व्यवस्थापन हीच त्यांच्या शेतीची ओळख आहे.बारामतीच्या उष्ण व कोरड्या हवामानात स्ट्रॉबेरी शक्य नाही, असे अनेकांचे मत होते. मात्र अभ्यास, नियोजन आणि चिकाटी यांच्या जोरावर त्यांनी हा समज चुकीचा ठरवला.

पिकाची ‘भाषा’ ओळखणे हेच खरे तंत्रज्ञान

“पानांचा रंग, झाडांची वाढ आणि हालचाल पाहिली की पीक काय सांगते हे समजले पाहिजे,” असे दीपक जगताप सांगतात.थ्रिप्स, माईट्स आणि मूळकुज यांसारख्या समस्यांवर त्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. रोग येण्याआधीच लक्षणे टिपणे आणि योग्य वेळी व्यवस्थापन करणे हे त्यांच्या यशाचे गमक ठरले. निसर्गाशी सुसंवाद साधत शेती करण्याचा त्यांचा दृष्टिकोन निर्णायक ठरला.

हवामान व्यवस्थापनाचा अचूक प्रयोग

स्ट्रॉबेरीसाठी त्यांनी वाई परिसरातून ‘विंटर’ वाणाची सुमारे १० हजार रोपे आणली.ऑक्टोबरमधील उष्णतेचा परिणाम टाळण्यासाठी लागवडीनंतर त्वरित प्लास्टिक मल्चिंग न करता तीन आठवड्यांनी मल्चिंग केले. उसाच्या पाचटाचा वापर करून स्ट्रॉ मल्चिंग केल्याने जमिनीचे तापमान नियंत्रित राहिले, ओलावा टिकून राहिला आणि रोपांना नैसर्गिक गारवा मिळाला.

१० गुंठ्यात लाखोंचे अर्थकारण

पारंपरिक उसासाठी एक एकर क्षेत्र आणि १८ महिन्यांचा कालावधी लागतो. त्यातून साधारण १.५ ते २ लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते.याउलट, अवघ्या १० गुंठ्यात स्ट्रॉबेरीची लागवड करून जगताप यांनी ५ ते ६ महिन्यांत सुमारे ९ ते ९.५ लाख रुपयांचे उत्पादन घेतले.सुमारे ४ लाख रुपयांचा खर्च वजा जाता ४.५ ते ५ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. पुढील दोन महिन्यांत उत्पादन वाढण्याची शक्यता असल्याने नफ्यात आणखी वाढ होणार आहे.

थेट बाजारपेठेपर्यंत पोहोच

उत्पादनाबरोबरच मार्केटिंगवरही त्यांनी विशेष भर दिला. स्थानिक बाजारपेठेवर अवलंबून न राहता कोल्हापूर, बेळगाव आणि बेंगळुरू येथे थेट माल पाठवण्यात आला.सुरुवातीला प्रति किलो ३०० रुपयांपर्यंत दर मिळाला. नंतर दरात चढ-उतार झाले तरी सातत्यपूर्ण उत्पादनामुळे उत्पन्न स्थिर राहिले.

आधुनिक शेतीचा नवा आदर्श

कमी क्षेत्र, कमी कालावधी आणि जास्त उत्पादन या सूत्रावर आधारित हा प्रयोग बारामती परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक शेतीपलीकडे जाऊन वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारल्यास कोणतेही पीक योग्य नियोजनाने शक्य होते, हे दीपक जगताप यांनी सिद्ध करून दाखवले आहे.