फ्लीट ग्राहकांसाठी टाटा मोटर्सची नवीन XPRES कार लाँच; पेट्रोल आणि CNG पर्याय उपलब्ध

महाराष्ट्र

मुंबई: टाटा मोटर्सने भारतात फ्लीट आणि टॅक्सी ग्राहकांसाठी खास डिझाइन केलेली आपली नवीन XPRES कार अधिकृतपणे लाँच केली आहे. ही कार पेट्रोल आणि CNG अशा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध असून कमी खर्चात जास्त उपयोगिता देण्यावर भर देण्यात आला आहे.

टाटाच्या पर्पज-बिल्ट फ्लीट पोर्टफोलिओमध्ये XPRES मुळे आणखी भर पडली आहे. यापूर्वी बाजारात चांगला प्रतिसाद मिळालेल्या XPRES EV नंतर आता पेट्रोल आणि CNG व्हेरिएंटद्वारे मोठ्या फ्लीट मार्केटवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामुळे टाटा मोटर्सची मल्टी-पॉवरट्रेन रणनीती अधिक मजबूत होणार आहे.

XPRES पेट्रोल व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ₹5.59 लाख, तर CNG व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ₹6.59 लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. या कारचे बुकिंग देशभरातील टाटाच्या अधिकृत फ्लीट डीलरशिपवर सुरू झाले आहे.

या मॉडेलमध्ये 1.2 लीटर रेव्होट्रॉन इंजिन देण्यात आले असून ते मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. दररोज जास्त किलोमीटर चालवणाऱ्या फ्लीट वापरकर्त्यांसाठी विश्वसनीयता, टिकाऊपणा आणि कमी देखभाल खर्च यावर विशेष भर देण्यात आला आहे.

XPRES CNG मॉडेलचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यात देण्यात आलेली 70 लिटरची ड्युअल-सिलेंडर CNG टाकी. टाटाच्या मते, या सेगमेंटमध्ये ही सुविधा प्रथमच देण्यात आली आहे. यामुळे वारंवार इंधन भरण्याची गरज कमी होणार आहे. विशेष म्हणजे स्मार्ट पॅकेजिंगमुळे बूट स्पेसवर कोणताही परिणाम होत नाही. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 419 लिटरची बूट स्पेस उपलब्ध असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

फ्लीट ऑपरेटर्स आणि टॅक्सी चालकांसाठी किफायतशीर, टिकाऊ आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून टाटा XPRES महत्त्वाची भूमिका बजावेल, असा कंपनीला विश्वास आहे.