पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे, ही सक्षम आणि ज्ञानसमृद्ध समाजाच्या उभारणीची भक्कम पायाभरणी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
शिक्षक दिनानिमित्त पुण्यातील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, अध्यक्ष चषक तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आदर्श शिक्षकांचा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्राच्या विकासात शिक्षणाला नेहमीच अग्रक्रम देण्याची भूमिका अजितदादांची होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, आधुनिक आणि जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, हे त्यांचे स्वप्न होते. पुणे मॉडेल स्कूल, डिजिटल शिक्षण आणि विविध आधुनिक शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून हा विचार पुढे नेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
पुणे ही शिक्षणाची पंढरी आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला शिक्षणाचा समृद्ध वारसा आज जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून पुढे नेला जात आहे. या शाळांमध्ये शिकणारी मुले ही ग्रामीण महाराष्ट्राची खरी ताकद आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता कौशल्याधारित आणि मूल्याधारित शिक्षणासोबत डिजिटल शिक्षण आणि AI साक्षरतेची जोड देणे आवश्यक आहे, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा अशीच पुढे न्यावी आणि शिक्षकांनी ज्ञानदानाचे हे पवित्र कार्य अधिक जोमाने सुरू ठेवावे, यासाठी सुनेत्रा पवार यांनी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.