नामदार एकनाथ शिंदे साहेब आमच्यावरील अन्याय दूर करावा!

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आपणांस पाच महिने झाले आणि या पाच महिन्यात अतिशय महत्वाकांक्षी असा ” हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी” नागपूर मुंबई या महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचे जंगी लोकार्पण सुद्धा केले. त्याबद्दल आपले मनापासून, अगदी अंतःकरणापासून अभिनंदन ! अशीच दमदार, दैदिप्यमान अशी जोरदार वाटचाल होवो आणि राज्याची भरभराट होवो हीच मनापासून शुभेच्छा ! हे करत असतांना आहुति सारख्या लहान वृत्तपत्रांवर होणारा अन्याय दूर करावा ही मनापासून कळकळीची विनंती.

३० जून रोजी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात आणि ठाणे जिल्ह्याला मुख्यमंत्री पदाचा पहिला मान मिळवून दिला. त्याबद्दल ७ जुलै रोजी, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली, आहुतिच्या कार्यकारी संपादक मनिषा त्रिवेदी आणि पत्रकार अजिंक्य म्हात्रे यांच्या समवेत आपली भेट घेऊन आपले अभिनंदन केले होते. पुष्पगुच्छ किंवा भेट वस्तू न देता मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करणारा लहान रकमेचा धनादेश दिला होता. त्याविषयी आपणास पत्र दिले होते. ते पत्र वाचून आपण धन्यवाद देत कौतुकही केले होते.

आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल आम्हाला मनापासून आनंद झाला होता तो केवळ ठाणे जिल्ह्याला राज्य स्थापनेपासून प्रथमच मुख्यमंत्री पदाचा बहुमान मिळाला म्हणून. तसेही ठाणे जिल्हा हा मुंबईला सर्व काही सहाय्य करत असतांना ठाणे जिल्ह्यावर सतत अन्यायच होत आला आहे. भांडल्याशिवाय काहीही मिळालेले नाही हे वास्तव आहे. म्हणूनच आपण केलेले बंड मनाला न पटणारे असूनही केवळ ठाणे जिल्ह्याला मुख्यमंत्री पद मिळाले म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. त्याची आम्हाला जी किंमत चुकवावी लागली याची आपणास अजिबात कल्पना नसेल. असो. आपली कारकीर्द दैदिप्यमान होऊन आपणास देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळो हीच मनापासून सदिच्छा व्यक्त करतो आणि शिवचरणी प्रार्थनाही करतो.

यानिमित्ताने एक महत्वाची मागणी करीत आहे, ती म्हणजे आपण मुख्यमंत्री झाल्याने वृत्तपत्रांना खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले आहेत. आपल्या जेमतेम पाच महिन्याच्या कालावधीत वृत्तपत्रांना भरभरुन जाहिरातीच्या माध्यमातून मदत झाली आहे. गेल्या पाच महिन्यांत वृत्तपत्रांना भरपूर जाहिराती मिळाल्या आहेत. मात्र त्यात आहुति सारख्या लहान वृत्तपत्रांवर सतत अन्याय झाला आहे.

एक म्हणजे काही जाहिराती या केवळ मोठ्या वृत्तपत्रांनाच देण्यात आल्या आहेत, तर काही जाहिराती या मोठ्या वृत्तपत्रांना मोठ्या आकाराच्या आणि लहान वृत्तपत्रांना लहान आकाराच्या देण्यात आल्या आहेत. हा दुजाभाव राज्याच्या स्थापनेपासून प्रथमच झाला आहे आणि तो आपल्या कारकिर्दीत झाला आहे त्याचे मनापासून वाईट वाटत आहे.

वास्तविक असा भेदभाव करण्याचे आदेश निश्चितच आपण दिले नसणार. मात्र ज्या कोणी झारीतील शुक्राचार्यांनी हे आदेश दिले आहेत, त्यामुळे बदनामी मात्र आपलीच झाली आहे हे मुद्दाम निदर्शनास आणून देत आहे. याबाबतीत केवळ दोनच उदाहरणे देत आहे. पहिले म्हणजे, राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व वृत्तपत्रांना जाहिरात वितरित करण्यात आली आहे.

परंतु लघु वृत्तपत्रांना नेहमीप्रमाणे ४०० चौरस सेंटीमीटर आकाराची जाहिरात वितरित करण्यात आली आहे. परंतु हीच जाहिरात मोठ्या व मध्यम वृत्तपत्रांना रंगीत व १६०० चौरस सेंटीमीटर देण्यात आलेली आहे. दुसरे म्हणजे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आणि आपल्या अध्यक्षतेखाली हा अतिशय ऐतिहासिक आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यानिमित्त मोठ्या वर्तमानपत्रांना किमान एक ते दोन पानी जाहिराती देण्यात आल्या आहेत. मात्र या सोहळ्याची एक रुपयाची सुद्धा जाहिरात लघु वृत्तपत्रांना देण्यात आली नाही. तिसरे म्हणजे, आहुति दिवाळी विशेष अंकाला दर वर्षी मुख्यमंत्री कोट्यातून विशेष जाहिरात मिळते. मात्र यंदा वेळेपूर्वी आपणास पत्र देऊनही यंदा आहुति दिवाळी विशेष अंकाला विशेष जाहिरात आपल्या कोट्यातून मिळालेली नाही.

या सर्वांची आपणास पुसटशी सुद्धा कल्पना असण्याची शक्यता फारच कमी वाटते. रडल्याशिवाय आई सुद्धा आपल्या बाळाला खायला देत नाही. या तत्वानुसार आपणाकडे मनमोकळे करण्याचा हा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे आपणच खऱ्या अर्थाने पालक आहेत. म्हणून हा प्रपंच. गेल्या पाच महिन्यातील लघु वृत्तपत्रांवर झालेल्या या अन्यायाचा अनुशेष भरून निघावा ही यानिमित्ताने मागणी करीत आहे.

“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गा”चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आणि आपल्या अध्यक्षतेखाली हा अतिशय ऐतिहासिक आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमानिमित्त राज्य शासनातर्फे मोठ्या प्रमाणात जाहिराती देण्यात आल्या आहेत.

वृत्तवाहिन्या आणि मोठ्या वर्तमानपत्रांना वारेमाप जाहिराती देण्यात आल्या आहेत. मात्र खेदाने निदर्शनास आणून द्यावेसे वाटते ते हे की या कार्यक्रमानिमित्त एक रुपयाची सुद्धा जाहिरात आहुति सारख्या लहान वृत्तपत्रांना देण्यात आली नाही. आहुति ला या सोहळ्याची पानभर जाहिरात मिळाली असती तर या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण चार पानी अंक प्रकाशित केला असता.

लहान वृत्तपत्रांना जाहिरात देऊ नये असे आदेश आपण निश्चितच दिलेले नसतील अशी मला मनापासून खात्री वाटते. मग यातील कोण झारीतील शुक्राचार्य आहेत, ज्यांनी हा दुजाभाव केलेला आहे. यामुळे लहान वृत्तपत्रांमध्ये आपल्याबाबतीत प्रचंड नाराजी वाढत चाललेली आहे. आपण ठाणे जिल्ह्याचे आणि आमचे लाडके आहात. आपली बदनामी थांबवावी या हेतूने हे संपादकीय लिहीत आहे. वास्तविक आपली भेट घेऊनच हे आपल्या लक्षात आणून द्यायची इच्छा होती. पण नजीकच्या काळात आपली प्रत्यक्ष भेट होणे अशक्य आहे. याचे कारण म्हणजे आपण आता नागपूर अधिवेशनाच्या गडबडीत आहेत.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि आपण नगरविकास मंत्री असतांना २०१८ – २०१९ या वर्षात मोठ्या आकाराच्या जाहिराती, ज्या मोठ्या वर्तमान पत्रांना दिल्या होत्या तशाच लहान वृत्तपत्रांनाही दिल्या होत्या. त्यामुळे लहान वृत्तपत्रांवरील आर्थिक बोजा कमी होण्यास हातभार लागला होता. करोनाच्या काळात आहुति सारख्या लहान वृत्तपत्रांची आर्थिक अवस्था अतिशय बिकट झाली आहे हे आपणही जाणता आहात.

याच विषयाबाबत महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचेवतीने आपणास एक निवेदन देण्यात आले होते त्याचा गोषवारा येथे प्रकाशित करीत आहे. दर्शनी जाहिरात वितरणात लघु वृत्तपत्रावर राज्य शासनाचा अन्याय का?

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचेवतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन करण्यात आल आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने विविध प्रसंगानिमित्त दर्शनी जाहिराती वितरित केल्या जातात. सर्व वर्गातील वृत्तपत्रांच्या निकोप वाढीचे धोरण राज्य शासनाने आखलेले असतानाच जी वृत्तपत्रे राज्य शासनाच्या बातम्या आणि विविध शासन निर्णय यांना प्राधान्याने प्रसिद्धी देतात अशा लघु वृत्तपत्रांना जाहिराती वितरण करताना मोठ्या व मध्यम वृत्तपत्रांच्या तुलनेमध्ये जाहिरातीचा आकार कमी करुन अन्याय केला जात आहे. हा अन्याय राज्य शासनाने लघु वृत्तपत्रावर करु नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ व संचालक सुनीलकुमार सरनाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व वृत्तपत्रांना जाहिरात वितरित करण्यात आली आहे. परंतु लघु वृत्तपत्रांना नेहमीप्रमाणे ४०० चौरस सेंटीमीटर आकाराची जाहिरात वितरित करण्यात आली आहे. परंतु हीच जाहिरात मोठ्या व मध्यम वृत्तपत्रांना रंगीत व १६०० चौरस सेंटीमीटर देण्यात आलेली आहे. लघु वृत्तपत्रांना किमान ८०० सेंटीमीटर तरी जाहिरात द्यायला हवी होती.

परंतु जाहिरात वितरणात राज्य शासनाच्या वतीने भेदभाव केला जात आहे. जी वृत्तपत्रे राज्य शासनाच्या विविध बातम्या व लेखांना प्राधान्याने प्रसिद्धी देतात त्याच वृत्तपत्रांना कमी आकाराची जाहिरात देऊन त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. हे धोरण राज्य शासनाने बदलावे आणि सर्व वृत्तपत्रांच्या निकोप वाढीसाठी जी मुख्य भूमिका राज्य शासनाची आहे त्या अनुषंगाने सर्वांना समान आकारातील जाहिराती द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या या जाहिरात वितरण प्रणालीतील भेदभावामुळे लघु वृत्तपत्रात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी राज्य शासनाने याची दखल घेऊन सर्वांना समान आकारातील जाहिराती वितरित केल्या पाहिजेत अशी भावना महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्या अनेक सभासदांनी व्यक्त केली आहे.

वास्तविक लघु वर्तमानपत्रे शासनाच्या योजना, ध्येयधोरणे याना ठळक प्रसिद्धी देत असतांना नेमका त्यांच्यावरच हा अन्याय का ? हा निर्णय अतिशय अयोग्य असून शासनाच्या बाबतीत लघु वृत्तपत्रांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. आहुति सारख्या वर्तमानपत्रातून कधीही नकारात्मक पत्रकारिता करण्यात आली नाही हा गुन्हा तर नाहीना असा प्रश्न मनात निर्माण होत आहे.

वृत्तपत्रांनी सकारात्मक पत्रकारिता करावी, पीत पत्रकारिता किंवा ब्लॅक मेलिंग करू नये असे लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांकडून उपदेशाचे सल्ले वरचेवर देण्यात येत असतात. अशा वेळी आहुति सारखी तत्वाने, सामाजिक बांधिलकी जपत, सकारात्मक पत्रकारिता करणाऱ्यांवर सतत अन्याय होत असेल तर हा अन्याय आपण आमचे पालक या नात्याने दूर करावा हीच यानिमित्ताने कळकळीची विनंती करीत आहोत.

गिरीश वसंत त्रिवेदी, संपादक साप्ताहिक, आहुति, अंबरनाथ पूर्व