दुःखाच्या वातावरणातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा पाठिंबा
मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं असून उद्या निकाल जाहीर होणार आहे. मतदानानंतर चा एक्झिट पोल समोर आला असून, त्यानुसार भाजप आणि शिंदेसेना महायुतीला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरच्या शोकाकुल वातावरणातही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मोठा पाठिंबा मिळाल्याचं चित्र या एक्झिट पोलमधून स्पष्ट होत आहे.
२९ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार सभा, रॅली न काढण्याचा निर्णय घेतला होता. केवळ पत्रकांद्वारे संपर्क साधत ही निवडणूक लढवण्यात आली.
दरम्यान, 12 जिल्हा परिषदांसाठी मतदान पार पडलं. त्यानंतर जाहीर झालेल्या साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार,
भाजप – २६३ जागा
शिवसेना (शिंदे गट) – १५६ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – ११७ जागा
असा अंदाज वर्तवण्यात आला असून, अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष राज्यात तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकांप्रमाणेच जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही महायुतीने महाविकास आघाडीवर सरशी मिळवल्याचं या एक्झिट पोलमधून दिसत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस वगळता अन्य कोणत्याही पक्षाला ५० पेक्षा जास्त जागा मिळालेल्या नाहीत.
एक्झिट पोलनुसार,
काँग्रेस – ६१ जागा
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – ४८ जागा
मनसे – ६ जागा
इतर पक्ष – ३७ जागा
या अंदाजामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठीच अजित पवार हे २९ जानेवारी रोजी बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत त्यांच्या चार सभा नियोजित होत्या. मात्र विमानतळाजवळच झालेल्या अपघाताने राज्य हादरलं. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही, मतदारांनी पक्षावर विश्वास दाखवल्याचं या एक्झिट पोलमधून अधोरेखित होत आहे.