सिंचन घोटाळ्याची फाईल आणि रहस्यमय मृत्यू! अजित पवारांच्या मृत्यूवर संसदेत संशयाचा बॉम्ब

महाराष्ट्र

नवी दिल्ली: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत संशय व्यक्त करत हा मुद्दा थेट संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला. इतक्या तडफदार आणि दमदार नेत्याचा अकाली मृत्यू होणं ही अत्यंत धक्कादायक व दुर्दैवी बाब असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

राज्यसभेतील भाषणात संजय राऊत म्हणाले, “मला अजित पवारांची आठवण येते. ते अत्यंत तडफदार नेते होते. गेल्या तीन वर्षांपासून ते भाजपसोबत होते, भाजपचे साथीदार होते.” मात्र याचवेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका करत सिंचन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला.

“अजित पवारांवर ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप भाजपच्याच नेत्यांनी केले होते. पण जेव्हा अजित पवार भाजपसोबत आले, तेव्हा ते अचानक पवित्र झाले,” असा खोचक टोला राऊतांनी लगावला.

संजय राऊत यांनी १५ जानेवारीच्या घटनेचा संदर्भ देत गंभीर आरोप केले. “१५ जानेवारीला अजित पवारांनी भाजपला प्रत्युत्तर देताना सिंचन घोटाळ्यात भाजपनंही भरपूर पैसे खाल्ल्याचा गंभीर आरोप केला होता. या घोटाळ्याची संपूर्ण फाईल आपल्याकडे असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यानंतर अवघ्या दहा दिवसांत त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला,” असं राऊत म्हणाले.

“ती फाईल नेमकी कुठे आहे? अजित पवार ती फाईल कायम स्वतःसोबत ठेवत असत, अशी माझी माहिती आहे. मुंबईहून बारामतीकडे निघतानाही ती फाईल त्यांच्याकडे होती. मुंबई सोडल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात त्यांचा मृत्यू झाला,” असा घटनाक्रम राऊतांनी सभागृहात मांडला.

अजित पवारांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा ठाम दावा करत संजय राऊत यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. “मला आज न्यायमूर्ती लोया यांची आठवण येते. अजित पवारांच्या मृत्यूमागे घातपात तर नाही ना?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

या वक्तव्यामुळे संसदेत तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणावर पुढील काळात तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.