कात्रज दूध संघाला ‘अजितदादा पवार’ यांचे नाव; संचालक मंडळाचा सर्वानुमते ठराव

महाराष्ट्र

पुणे: पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज) या संघाला आता ‘अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज’ असे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय संघाच्या संचालक मंडळाने सर्वानुमते घेतला आहे.

शनिवारी (ता. ३१) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला. सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि पुणे जिल्ह्यातील सहकार चळवळीचे बळ असलेले अजितदादा पवार यांचे बुधवारी (ता. २८) अकस्मात निधन झाल्याने संपूर्ण सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे. ही हानी पुणे जिल्ह्यातील सहकार चळवळीसाठी आणि विशेषतः कात्रज दूध संघासाठी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना संघाने व्यक्त केली आहे.

संघ प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अजितदादा पवार यांनी पुणे जिल्ह्यातील सहकार चळवळीला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. संघाच्या वार्षिक सभांना उपस्थित राहून संस्थेच्या कार्यपद्धती, विस्तार योजना तसेच प्रशासनिक समन्वयासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण पाठबळ दिले होते. पवार कुटुंबाचे सहकार चळवळीला आणि संघाच्या विविध उपक्रमांना सातत्याने सहकार्य लाभत आले आहे.

संघाच्या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर, विशेषतः पायाभूत सुविधा उभारणी व दीर्घकालीन नियोजनासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत अजितदादा पवार यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरली. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी संस्थात्मक बळकटीकरण, सहकारी संस्थांचे सक्षमीकरण आणि दीर्घकालीन विकासाचा व्यापक दृष्टिकोन हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य असल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अध्यक्ष अॅड. स्वप्नील ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपाध्यक्ष तानाजी जगताप यांच्यासह संचालक गोपाळराव म्हस्के, विष्णु हिंगे, बाळासाहेब नेवाळे, बाळसाहेब खिलारी, केशरताई पवार, भगवान पासलकर, दिलीप थोपटे, राहुल दिवेकर, भाऊसाहेब देवाडे, अरुण चांभारे, कालिदास गोपाळघरे, निखिल तांबे, लताताई गोपाळे, चंद्रकांत भिंगारे उपस्थित होते. सर्व संचालकांनी नामकरणाच्या निर्णयास एकमताने मंजुरी दिली.

हा निर्णय केवळ नाव बदलण्यापुरता मर्यादित नसून सहकार क्षेत्रासाठी केलेल्या अजितदादा पवार यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी नेतृत्वाची स्मृती जपण्याचा प्रयत्न असल्याचे संघाकडून स्पष्ट करण्यात आले. नामकरणासंदर्भातील पुढील प्रशासकीय प्रक्रिया व आवश्यक परवानग्या लवकरच पूर्ण केल्या जाणार असल्याचेही सांगण्यात आले.