ठाणे: ठाण्यातील क्लस्टर पुनर्विकास हा केवळ जुन्या घरांच्या जागी नवीन इमारती उभारण्याचा प्रकल्प नसून, हजारो कुटुंबांच्या जीवनाची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न आहे. सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर क्लस्टर योजनेच्या माध्यमातून सुमारे ६ हजार कुटुंबांना सुरक्षित व दर्जेदार घरे देतानाच २३ नागरी सुविधा, रोजगाराच्या संधी आणि नियोजित टाऊनशिप उभारण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
सुमारे २० हेक्टर अर्थात ५० एकर परिसरात हा क्लस्टर विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये निवासी इमारतींसोबत रुंद रस्ते, मुबलक पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, उद्याने, मैदाने, कम्युनिटी हॉल, जिम्नॅशियम, योगा सेंटर, इनडोअर गेम्स, डिजिटल लायब्ररी, डे-केअर सेंटर, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, महिला सक्षमीकरण केंद्र आणि स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग अशा सुविधांचा समावेश असेल. ‘सिटी विथिन द सिटी’ या संकल्पनेतून हा परिसर विकसित केला जाणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
२० वर्षांच्या संघर्षानंतर क्लस्टरला गती
ठाण्यातील धोकादायक इमारतींच्या दुर्घटनांचा संदर्भ देत शिंदे यांनी क्लस्टर पुनर्विकासासाठी गेल्या २० वर्षांत संघर्ष झाल्याचे नमूद केले. किसननगरसह ठाण्यातील विविध दुर्घटनांनंतर धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपोषणे, मोर्चे आणि विधानसभेत सातत्याने आवाज उठवण्यात आला. नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून धोरणात्मक अडथळे दूर करून क्लस्टर योजना प्रत्यक्षात आणल्याचे त्यांनी सांगितले.किसननगरमधील पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे असून, लवकरच रहिवाशांना घरांच्या चाव्या देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
‘वॉक टू वर्क’वर भर
क्लस्टरमध्ये केवळ निवासी बांधकाम न करता कमर्शियल विकास आणि स्थानिक रोजगारनिर्मितीवर भर देण्याची भूमिका शिंदे यांनी मांडली. “घरातून उतरायचे आणि जवळच कामाला जायचे,” या ‘वॉक टू वर्क’ संकल्पनेतून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सिद्धेश्वर तलाव परिसराचा पुनर्विकास, स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्यात येणार असून, त्यामुळे तलावाला मोकळा श्वास मिळेल, असेही शिंदे म्हणाले.
दुकानदारांच्या पुनर्वसनाचाही विचार
क्लस्टरमधील रहिवाशांच्या विविध मागण्यांबाबत कॉर्पस फंड, अतिरिक्त १०० चौरस फुटांची जागा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे तसेच छोट्या दुकानदारांच्या पुनर्वसनाचा विचार करण्याचे संकेत शिंदे यांनी दिले.
विकासकांना दर्जाबाबत स्पष्ट सूचना देताना, “दोन पैसे कमी नफा झाला तरी चालेल; नागरिकांच्या घरांच्या दर्जात कपात करू नका,” असे शिंदे यांनी सांगितले. सरकार आणि महापालिकेकडून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एमएमआरमध्ये ३० लाख घरांची गरज
मुंबई आणि एमएमआरमध्ये पुढील १५ ते २० वर्षांत सुमारे ३० लाख घरांची गरज भासणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आदी शहरांमध्ये क्लस्टर पुनर्विकासाला चालना देण्याचे धोरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
युनिफाइड डीसीपीआरमधील बदलांमुळे क्लस्टर आणि एसआरए प्रकल्पांना गती मिळाल्याचा दावा त्यांनी केला. मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड आणि ठाणे-बोरिवली बोगदा यांसारख्या पायाभूत प्रकल्पांमुळे ठाण्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
“क्लस्टर म्हणजे बदललेले जीवनमान”
क्लस्टरमधील इमारती दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करत आयकॉनिक इमारतींसाठी प्रोत्साहनात्मक एफएसआयची तरतूद असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
“क्लस्टर म्हणजे केवळ घर नव्हे; चांगले घर, चांगल्या सुविधा, रोजगार आणि बदललेले जीवनमान,” असा संदेश देत त्यांनी हरिवंश राय बच्चन यांच्या ‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती’ या ओळींचा दाखला दिला.
दरम्यान, विकासकांनी नागरिकांना वेळेत घरे देतानाच चांगल्या सुविधांसोबत मोठा टीव्हीही भेट म्हणून द्यावा, अशी मिश्कील सूचनाही शिंदे यांनी केली.या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अॅड. निरंजन डावखरे, आमदार रविंद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, डॉ. माधव कुसेकर, प्रशांत रोडे, सभागृह नेते हनुमान जगदाळे, विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण, शहरप्रमुख हेमंत पवार, नगरसेवक नारायण पवार, राम रेपाळे, राजेश मोरे, पवन कदम, संजय वाघुले यांच्यासह ठाण्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.