दोन गणेश मंडळांच्या कर्णकर्कश मिरवणुकीवर नागरिकांची तक्रार; पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांची तातडीने कारवाई
शिरूर (तेजस फडके): सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी डीजेवर निर्बंध असतानाही सादलगावात दोन सार्वजनिक गणेश मंडळांकडून डीजेचा मोठा आवाज लावून मिरवणूक काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला. कर्णकर्कश आवाजामुळे त्रस्त झालेल्या जागरूक नागरिकांनी थेट शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पाटील यांनी तातडीने सादलगावात दाखल होत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली आणि डीजे बंद करण्याची कारवाई केली. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले.
सादलगाव येथे यंदा एकूण सहा सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी गावातील दोन मंडळांनी यापूर्वीच डीजे बुक केल्याची माहिती आहे. मात्र, मिरवणुकीत कोणाचा डीजे अधिक मोठा आवाज करतो, यावरून निर्माण झालेल्या चुरशीने परिस्थिती गंभीर बनल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मोठ्या कर्कश आवाजात डीजे वाजवत मिरवणूक सुरू करण्यात आली.
दरम्यान, पोलीस निरीक्षक विनोद पाटील हे वडगाव रासाई परिसरात असताना सादलगावातील डीजेच्या कर्णकर्कश आवाजाबाबत त्यांना माहिती देण्यात आली. ध्वनी प्रदूषणामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांकडून पोलिसांना अनेक फोन करण्यात आले. परिस्थितीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पाटील यांनी विलंब न करता सादलगाव गाठले.
गावातील चौकात पोहोचल्यानंतर डीजेचा मोठा आवाज प्रत्यक्ष त्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी डीजे ऑपरेटरला खाली उतरवून डीजे बंद करण्याची कारवाई केली. पोलिस निरीक्षकांनी स्वतः घटनास्थळी येऊन कारवाई केल्याने ‘कायदा सर्वांसाठी समान’ असल्याचा संदेश गेला असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
‘उलटा चोर कोतवाल को डाटे’चा प्रकार?
मात्र, डीजे बंद करण्यापूर्वी गावातील पोलीस पाटील दिव्या कारकोड यांनी संबंधित गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना डीजे न वाजविण्याबाबत सूचना केल्याची माहिती समोर आली आहे. या वेळी काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस पाटील यांना घेराव घालून, ‘आमचा डीजे बंद केला, तर उद्या गावातील कोणताही डीजे वाजता कामा नये; अन्यथा आंदोलन करण्यात येईल,’ अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप आहे.
विशेष म्हणजे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी डीजे बंदीचे पालन करण्याची सूचना करणाऱ्या महिला पोलीस पाटील यांच्यावरच दबाव आणला जात असल्याचा आरोप झाल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. ‘गावात डीजे वाजला तर त्याची जबाबदारी पोलीस पाटलांचीच राहील,’ अशा स्वरूपाचे वक्तव्य करण्यात आल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे.
नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार का?
पोलीस प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून डीजे बंद केला असला, तरी डीजेवरील निर्बंध झुगारून मिरवणूक काढणाऱ्या संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई होणार का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. नियम सर्वांसाठी समान असतील, तर निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केवळ डीजे बंद करण्यापुरती कारवाई न करता कायद्यानुसार जबाबदारी निश्चित केली जाणार का, याकडे सादलगावकरांचे लक्ष लागले आहे.
ध्वनी प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण तसेच इतर नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून नियम लागू केले जातात. त्यामुळे उत्सवाचा आनंद घेताना नियमांचे पालन करणे ही मंडळांचीही जबाबदारी आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असली, तरी ‘डीजे बंदी मोडणाऱ्यांवर आता ठोस कारवाई होणार का?’ हा सवाल सादलगावातील नागरिक उपस्थित करत आहेत.