मुंबई: महाराष्ट्राचा ६५ वर्षाचा इतिहास नवीन पिढीला माहीत नाही. पुस्तके वाचली तरच तो कळणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीचा इतिहास पक्षाने सर्वांसमोर आणला आहे. याचा नवीन पिढीला नक्कीच फायदा होणार आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. महाराष्ट्राची निर्मिती संघर्षांतून झाली आणि आजही महाराष्ट्र संघर्ष करत आहे. बेळगाव कारवारचा भाग अजून महाराष्ट्रात आला नाहीय. तो भाग येईल तेव्हा महाराष्ट्र पूर्ण होईल असेही अजित पवार म्हणाले.
यशवंतराव चव्हाण ते देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीत महाराष्ट्राला पुढे नेले आहे. शेतकऱ्यांच्या भल्याकरता सरकार काम करत आहेत. वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात. राज्यातील जनतेचा विकास कसा होईल हे स्वप्न स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी पाहिले तेच स्वप्न पूर्ण करण्याचे काम करत असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. जीवात जीव असेपर्यंत शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांचे विचार कदापि सोडणार नाही असा निर्धारही अजितदादा पवार यांनी व्यक्त केला. सुसंस्कृत राजकारण कसे करायचे हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दाखवले आहे आणि त्यांच्या विचारावर काम करत आहोत असेही अजित पवार म्हणाले.
मानवंदना करणारा हा सोहळा असून दरवर्षी असे काम करायचे आणि नवीन पिढीला आठवण करून द्यायची आहे. महाराष्ट्राच्या भल्याकरता जे काही करता येईल त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता व सरकार कमी पडणार नाही अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. शिव- शाहू – फुले – आंबेडकर यांचे विचार कधी सोडणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगितल्याचे प्रफुल पटेल यांनी आवर्जून सांगितले.
पुरोगामी विचार सांगणारे अनेक दिसतील त्यांच्या मनात मुह मे राम बगलमे छुरी दिसेल परंतु अजितदादा तसे नाहीत दादांच्या तोंडात आणि शब्दातही रामच आहे अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल विरोधकांना सुनावले. १०६ हुतात्म्यांनी प्राणार्पण केले त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाले. ज्याला इतिहास माहित नाही तो भविष्य घडवू शकत नाही. असे सांगतानाच संयुक्त महाराष्ट्र लढाच ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उभा केला.
पहलगाम येथे आपले बांधव मारले गेले त्याचा अख्ख्या जगाने या घटनेचा निषेध केला. आता नुसता सर्जिकल स्ट्राईकने काही होणार नाही त्यांची सर्जरीच केली पाहिजे अशा स्पष्ट शब्दात छगन भुजबळ यांनी पहलगाम हल्ल्यावर सुनावले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आम्ही जल आणि मृदा कलश घेऊन आम्ही संयुक्त महाराष्ट्र महोत्सव साजरा करत आहोत असेही प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले. महाराष्ट्राची सांस्कृतिक भूमी आज इथे अनुभवायला मिळाली आहे. राज्यात विजयादशमी अर्थात दसरा सण जसा साजरा केला जातो तसा महाराष्ट्राचा गौरव दिन दरवर्षी साजरा करणार असल्याचे सुनिल तटकरे यांनी जाहीर केले.
‘संगम कलेचा सन्मान संस्कृतीचा’ ही भूमिका घेत आज राष्ट्रवादी काँग्रेसने ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५’ चे आयोजन केले होते त्याचे आज उद्घाटन वरळीच्या जांबोरी मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी थाटात केले. यावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा सचित्र इतिहास मांडणारे गर्जा महाराष्ट्र दालन, महाराष्ट्राचा विचार घडवणार्या महापुरूषांचे विचारसुत्र दालन, संत महात्म्यांची शिकवणूक सांगणारे महाराष्ट्र धर्म दालन, विविध क्षेत्रात देशस्तरावरील व महाराष्ट्राचे सर्वोच्च पुरस्कार मिळवणाऱ्या ख्यातनाम व्यक्तींचे महाराष्ट्र रत्न दालन, राज्याच्या ६५ वर्षाच्या वाटचालीत सर्व मुख्यमंत्र्यांच्या योगदानाची विशेष दखल घेणारे मुख्यमंत्री दालन या पाच दालनांचे उद्घाटन अजितदादा पवार यांनी केले.
सुरुवातीला हुतात्मा स्मारकावर जात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आदींनी १०६ हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर वरळी नाका ते जांबोरी मैदान अशी राज्यातील पाच विभागातून आणलेल्या जल व मृदा मंगलकलश भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन झाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पद्मविभूषण जावेद अख्तर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी जावेद अख्तर यांनी मनोगत व्यक्त करताना जो कुछ है ये नगरका है. इसका उपकार कभी मै भुला नही सकता… महाराष्ट्र और मुंबई का दिल हमारा है… महाराष्ट्र का दिल दर्यादिल है… महाराष्ट्र मिनी भारत है… अशा शब्दात आपले विचार मांडले. पहलगाम भुलना नही चाहिए… दुश्मनो की नजर है… हमने आपका क्या बिगाडा है मुंबई ने क्या बिगाडा है… असा सवालही जावेद अख्तर दहशतवाद्यांना केला.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी आपल्या मनोगतात पुरोगामी विचार हेच आमचे भांडवल आहे. याच भांडवलावर मी आज पुरोगामी विचारांची लढाई लढत आहे असे सांगतानाच राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा सहवास लाभला त्यांच्यासोबत काम करता आले हेही आवर्जून सांगितले. यावेळी मधुकर भावे यांनी ६५ वर्षातील संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास सांगितला.
ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी आपली दृष्टी व्यापक असली पाहिजे. आपला महाराष्ट्र धर्म आहे. महाराष्ट्रासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांचा सन्मान केला त्याबद्दल आपल्या मनोगतात आभार मानले. यावेळी नंदेश उमप यांचा मी मराठी गीतांचा कार्यक्रम पार पडला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पद्मविभूषण जावेद अख्तर, सदानंद मोरे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, खासदार सुनेत्रा पवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ,मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.