मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे प्रवक्ते महेश तपासे यांनी RSS-BJPच्या तिरंगा रॅलीवर जोरदार टीका केली आहे. तिरंगा रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रवादाचे प्रदर्शन केले जात असून, RSSच्या इतिहासातील काही घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप तपासे यांनी केला.
तपासे म्हणाले की, “भाजप आणि त्यांची मातृसंस्था RSS तिरंगा यात्रेच्या नावाखाली फोटोसेशन करतात आणि देशाला देशभक्तीचे धडे देतात. मात्र देशभक्ती ही वर्षातून एकदा कॅमेऱ्यासमोर दाखवण्याची गोष्ट नाही. तिचा इतिहास आहे आणि इतिहास खोटे बोलत नाही.”
‘RSS मुख्यालयावर ५२ वर्षे तिरंगा फडकला नाही’
RSSच्या नागपूर येथील मुख्यालयावर स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात १५ ऑगस्ट १९४७ आणि २६ जानेवारी १९५० रोजी तिरंगा फडकवण्यात आला. त्यानंतर तब्बल ५२ वर्षे मुख्यालयावर तिरंगा फडकला नसल्याचा दावा तपासे यांनी केला.
२००१ मध्ये काही तरुण कार्यकर्त्यांनी RSSच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आणि त्यानंतर RSSने नियमितपणे ध्वजारोहण करण्यास सुरुवात केल्याचा दावा त्यांनी केला.
गोलवलकरांच्या भूमिकेचा दाखला
RSSचे माजी सरसंघचालक म. स. गोलवलकर यांच्या लिखाणाचा संदर्भ देत तपासे यांनी संघाच्या राष्ट्रवादाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. तसेच RSSचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’मधील १९४७ मधील तिरंग्याविषयीच्या भूमिकेचाही त्यांनी उल्लेख केला.
“भारताच्या संविधान सभेने तिरंग्याला राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारण्याच्या पार्श्वभूमीवर ‘ऑर्गनायझर’ने तिरंग्याच्या निवडीवर टीका केली होती. आज त्याच तिरंग्याच्या नावाने देशभक्तीचे प्रदर्शन केले जात आहे,” असा टोला तपासे यांनी लगावला.
याच पार्श्वभूमीवर त्यांनी RSSचे सरसंघचालक मोहन भागवत यांना सवाल केला. “स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने Gen-Z सोबत संवाद साधताना मोहन भागवत याबाबतही बोलतील का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
‘स्वातंत्र्य चळवळीत RSSची संघटनात्मक भूमिका काय?’
१९२५ मध्ये RSSची स्थापना झाल्यापासून १९४७ पर्यंत संघटना म्हणून RSSने स्वातंत्र्य चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला नसल्याचा दावा तपासे यांनी केला. सविनय कायदेभंग चळवळ तसेच १९४२च्या भारत छोडो आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी RSSच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांसारखे नेते ब्रिटिशांविरोधात संघर्ष करत असताना RSSची भूमिका काय होती?” असा सवाल त्यांनी केला.
‘देशाला राष्ट्रवादाचे धडे देणे थांबवा’
भाजप-RSSच्या सध्याच्या तिरंगा मोहिमांकडे इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात असल्याचा आरोप तपासे यांनी केला.
“स्वातंत्र्यलढ्यापासून दूर राहून शंभर वर्षांनंतर त्या चळवळीवर प्रेम असल्याचा दावा करता येणार नाही. तिरंगा हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, त्याग केलेल्या आणि बलिदान दिलेल्या प्रत्येक भारतीयाचा आहे,” असे तपासे म्हणाले.
खरा राष्ट्रवाद हा ब्रिटिशांविरोधात लढलेल्या आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानातून निर्माण झाला असल्याचे सांगत तपासे यांनी RSS-BJPवर जोरदार निशाणा साधला.