शक्तिपीठ महामार्गासाठी सरकारकडून पोलीस बळाचा वापर, शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्ती लाटण्याचा घाट

महाराष्ट्र

मुंबई: गेल्या २४ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात झालेली गारपीट आणि दुसरीकडे ‘शक्तिपीठ महामार्गा’साठी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, यावरून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत आक्रमक पवित्रा घेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची स्थिती मांडली.

विदर्भ आणि मराठवाड्यातील नुकसानीचा पाढा वाचताना वडेट्टीवार म्हणाले की नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर ,नांदेड ,परभणी भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने ज्वारी, गहू, हरभरा ही काढणीला आलेली पिके मातीमोल झाली आहेत. आंबा आणि द्राक्ष बागायतदारांचेही अतोनात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने सोलापूर, परभणी, नांदेड, धाराशीव भागात पुढील दोन दिवस पावसाचा इशारा दिला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, अस वडेट्टीवार म्हणाले

मागील अतिवृष्टीची मदत अजून मिळालेली नाही, धानाला बोनस जाहीर करून देण्यात आलेला नाही आणि आता पुन्हा संकट आले आहे. सरकारने नियम-निकष बाजूला ठेवून तातडीने रोख मदत द्यावी आणि पंचनाम्यांचे केवळ आदेश न देता प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

एकीकडे अवकाळी पावसाने शेतकरी उध्वस्त होत असताना दुसरीकडे शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या घराघरांवर नोटिसा चिकटवून दहशत निर्माण केली जात आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी सुरू आहे सहजपूर-जवळा सारख्या ६०० लोकसंख्येच्या गावात १,००० पोलिसांचा फौजफाटा तैनात करून मोजणी प्रक्रिया राबवली जात आहे. हे लोकशाहीला भूषणावह नाही.

धाराशीव, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी २३ फेब्रुवारीला या प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारला होता. हा प्रकल्प रद्द करावा, अशी जनभावना असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

एकीकडे अस्मानी संकटामुळे शेतकरी खचला आहे, तर दुसरीकडे सुलतानी संकटाप्रमाणे सरकार पोलीस बळाचा वापर करून त्यांच्या जमिनी हिसकावत आहे. सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी विधिमंडळ नेते विजय वडेटीवार यांनी केली. विधानसभा अध्यक्ष यांनी याची दखल घेऊन सरकारला निवेदन करण्याचे निर्देश दिले.