विविध योजनांची माहिती व प्रचार -प्रसार करण्यासाठी पालखी मार्गावर परिवहन विभागाचा चित्ररथ

महाराष्ट्र

मुंबई: परिवहन विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी व त्यांचा जनमानसात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी परिवहन विभागाचा चित्ररथ यंदा तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर दिंडी सोबत मार्गक्रमण करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री श्री. ‌प्रताप सरनाईक यांनी दिली. या संदर्भात नियोजन व मार्गदर्शन करण्यासाठी मंत्री सरनाईक हे स्वतः उद्या (११जुन रोजी) पंढरपूर पर्यंत या पालखी मार्गाचा दौरा करणार आहेत.

मंत्री सरनाईक म्हणाले, संत तुकाराम महाराजांची पालखी १८ जून रोजी देहू येथून प्रस्थान करणार आहे. १८ जून ते ५ जुलै दरम्यान संपूर्ण पालखी मार्गावर दिंडी सोबत परिवहन विभागाने तयार केलेल्या एल.ई.डी. स्क्रीन, पोस्टर, बॅनर च्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देणारा चित्ररथ सहभागी होणार आहे. या पालखी मार्गावर विविध ठिकाणी सर्वसामान्य नागरिक आणि भक्तगण संत तुकाराम महाराजांच्या पालखी चे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यांना या चित्ररथाच्या माध्यमातून परिवहन योजनांची विशेषतः रस्ता सुरक्षा विषयक प्रशिक्षण व प्रबोधन, सुरक्षित वाहन चालवणे अशा विविध योजनांची माहिती देण्यासाठी व त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या अभिनव उपक्रमाची यंदापासून सुरुवात करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री सरनाईक यांनी केले. या अभिनव उपक्रमाच्या नियोजनासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक स्वतः आज दिनांक ११ जून रोजी या पालखी मार्गाने पंढरपूर येथे जाणार आहेत.

(अभिजीत भोसले)

जनसंपर्क अधिकारी 

मा. मंत्री परिवहन