मुंबई: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार सुभाष चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काल शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवरांनी सुभाष चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला.
सुभाष चव्हाण यांच्याबद्ल बोलताना प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “सुभाष चव्हाण हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते, त्यांनी आयुष्यभर पक्षासाठी काम केले. कोकणापासून मुंबईपर्यंत अनेक प्रांताध्यक्षांसोबत त्यांनी काम केले. पक्षाचा प्रवास त्यांनी पाहिला व त्यानंतरही पक्षासाठी ते कार्यरत होते व आजही ते पक्षासाठी काम करण्यास इच्छुक होते.
कोणते पद दिले नाही तरीही पूर्णवेळ टिळक भवनला देणार ही त्यांची जिद्द होती. पक्षाचा कार्यकर्ता कसा असावा, हे त्यांच्या बोलण्यातून दिसले. त्यांनी घरात जेवढा वेळ व्यतित केला त्यापेक्षा जास्त वेळ त्यांनी टिळक भवनात घालवला आहे. काँग्रेसचा जगन्नाथाचा हा रथ सुभाष चव्हाण यांच्यासारख्या कार्यकर्त्याच्या घामाचा थेंब टिळक भवनात सांडला आहे म्हणून चालत आहे, अशा शोकभावना हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी व्यक्त करून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना करतो”. असे म्हटले.
यावेळा गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, ज्य़ेष्ठ नेते हुसेन दलवाई, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव माजी आमदार संजय दत्त, बी.एम संदीप, आमदार भाई जगताप, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सुभाष चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी चव्हाण कुटुंबियांसह प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.