शहरात मेट्रोसाठी दोन उड्डाणपुल पाडावे लागणार…

महाराष्ट्र

औरंगाबाद: काल केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासमोर स्मार्ट सिटी कार्यालयात मेट्रोच्या कामाच्या डीपीआरचे सादरीकरण करण्यात आले. यानुसार शहरातील दोन उड्डाणपूल पाडावे लागणार असल्याची माहिती आहे. यानुसार शहरातील मोंढानाका, सेव्हनहिल उड्डाणपूल मेट्रोमुळे पाडावे लागणार आहेत. क्रांती चौक आणि सिडको येथील उड्डाणपूल कामात येतील अशी माहिती आहे.

अखंड उड्डाणपूल..!

अखंड उड्डाणपूल उभारण्यासाठी महामेट्रोने ३ हजार ६०० कोटी रुपयांचा ‘डीपीआर’ तयार केला आहे. त्यासोबतच मेट्रो रेल्वेसाठी ३ हजार २०० कोटी रुपयांचा उड्डाणपूल बांधण्यासाठीचा ‘डीपीआर’ बनविण्यात आला आहे. दोन्ही उड्डाणपूल मिळून ६ हजार ८०० कोटी रुपयांचा ‘डीपीआर’ तयार केला आहे.

असे असेल कामाचे स्वरुप…

चिकलठाणा ते वाळूजपर्यंत अखंड उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. हा पूल दुमजली (डबलडेकर) असेल. त्यावरुन वाहतूक आणि मेट्रोदेखील धावणार आहे. या कामाची परवानगी २०२३ मध्ये मिळाली तर पुढील तीन वर्षात काम पूर्ण होईल. नोव्हेंबर अखेरपर्यंत ‘डीपीआर’ सादर केला जाणार आहे. ‘डीपीआर’ तयार करताना शहर विकास आराखड्यात मेट्रोसाठी लागणारी जमीन संपादित करावी लागेल. त्यासोबतच संरक्षण विभागाकडून छावणीमधून मेट्रोचा पूल उभारण्याकरिता ना हरकत परवानगी घ्यावी लागेल. त्यामुळे मेट्रोचा ‘डीपीआर’ तयार झाल्यानंतरही या अडचणी प्रामुख्याने सोडवाव्या लागणार आहेत.