ज्येष्ठ समीक्षक नीलिमा जांगडा यांना ‘ललिता ताम्हाणे स्मृती पुरस्कार’ जाहीर

महाराष्ट्र

मुंबई: ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार पाटील यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या ‘कलाश्रम’ संस्थेतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘ललिता ताम्हाणे स्मृती पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व लेखिका नीलिमा जांगडा यांना जाहीर करण्यात आला आहे.

कलाश्रम संस्थेतर्फे दर महिन्याला ‘अभियान सन्मान’ हा उपक्रम राबविण्यात येतो. संबंधित महिन्यातील दिवंगत प्रज्ञावंतांचे स्मरण आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणाऱ्या गुणीजनांचा सन्मान, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. याच उपक्रमांतर्गत ज्येष्ठ सिने पत्रकार व लेखिका ललिता ताम्हाणे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या नावाचा पुरस्कार नीलिमा जांगडा यांना जाहीर करण्यात आला आहे.

नीलिमा जांगडा यांनी ‘लोकसत्ता’, ‘लोकमत’, ‘सामना’ आणि ‘प्रहार’ या दैनिकांत सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून काम करताना चित्रपट व नाट्य समीक्षणाला विशेष प्राधान्य दिले. ‘लोकप्रभा’मधील त्यांच्या स्तंभलेखनालाही रसिक वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. तसेच त्यांनी फिल्मसिटीतील काही मालिकांसाठी लेखनही केले आहे.शनिवार, ३० मे २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे आयोजित शानदार सोहळ्यात सुप्रसिद्ध नाटककार व दिग्दर्शक डॉ. अनिल बांदिवडेकर यांच्या हस्ते नीलिमा जांगडा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत