उत्तम करीअर म्हणजे काय?

महाराष्ट्र

मुंबई: उत्तम करिअर करण हे सध्याच्या काळात सहज आणि सुलभ असू शकत का? असा सवाल बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना पडतो. या प्रश्नाच्या दोन बाजू आहेत. सकारात्मक बाजूचा आपण विचार करु या. गेल्या काही वर्षात विशेषत: गेल्या पाच सहा वर्षात वेगवेगळ्या क्षेत्रात करिअरच्या विपुल संधी उपलब्ध झाल्या आहेत. कोणत्याही ज्ञानशाखेतील विद्यार्थ्यांना अशा संधी मिळू शकतात. अमुकच एक अभ्यासक्रम वा अमुकच एका शिक्षण संस्थेमधून अभ्यासक्रम केल्यावरच “चांगली-उत्तम-उत्कृष्ट” संधी मिळू शकते अशी स्थिती आता राहिलेली नाही.

चंद्रपूर, शेगाव, नागभीड किंवा पुसद सारख्या, मुंबई – पुणे- नाशिक – ठाणेच्या तुलनेने कितीतरी लहान असलेल्या या शहरे वा गावांमधील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुला/मुलींना मुंबई/ पुण्यामध्ये चांगल्या करिअर संधी मिळत आहेत. या छोट्या गावातील मुले/मुली परदेशातल्या नामवंत शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवत आहेत. तेव्हा महाविद्यालय किंवा शिक्षणसंस्था लहान गावातील आहेत की मोठया शहरातील आहेत हा आता कळीचा मुद्दा राहिलेला नाही. गेल्या काही वर्षात बहुतेक सगळयाच शाखांमध्ये विविध अभ्यासक्रम सुरु झाले आहेत. सध्याच्या काळाला उपयुक्त ठरणारे आणि एखादेतरी कौशल्य निर्मितीस उपयुक्त ठरु शकतील असे हे अभ्यासक्रम आहेत. एक वर्षापासून ते तीन वर्षांपर्यंत अशा कालावधीचे हे अभ्यासक्रम आहेत.

नव्या शैक्षणिक धोरणामध्ये यावर अधिक भर देण्यात आला आहे. असे काही अभ्यासक्रम हे शासकीय संस्थांमध्ये आहेत. तर बरेच अभ्यासक्रम चांगल्या दर्जेदार खाजगी संस्थांमधे आहेत. या संस्थांनी सुरु केलेल्या अभ्यासक्रमांना तंत्रशिक्षण मंडळ वा शासनाची मान्यता घेतलेली असते. हे अभ्यासक्रम एखाद्या क्षेत्रातील कौशल्यवृध्दीसाठी उपयुक्त ठरतात. अशा संस्था इंटर्नशीप आणि प्लेसमेंटसाठी मदतही करतात.

निराश होऊ नये

ही सध्याची परिस्थिती लक्षात घेतली तर कोणत्याही विद्यार्थी व पालकाने निराश होण्याची अजिबातच गरज नाही. मात्र वास्तवात 10 वी 12 वीमध्ये असणाऱ्या घरांमध्ये मुलगा 9 वीत गेला की मोठीच अस्वस्थता घर-घर करायला लागते. त्यातून पालक तणावात जातात आणि मुलांनाही निष्कारण तणावात जाण्यासाठी अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत ठरतात.

प्रत्येक मुलगा इंजिनीअर किंवा डॉक्टर किंवा चार्टर्ड अकाउंटंट (सीए) किंवा शास्त्रज्ञ किंवा वैमानिक किंवा वरिष्ठ शासकीय अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडियातील प्रोबेशनरी ऑफिसर, लष्करी अधिकारी होऊ शकत नाही, हे वास्तव पालकांनी हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आपला मुलगा अथवा मुलीची बुध्दीमत्ता कोणत्या पातळी अथवा स्तराची आहे, ही बाब पालकांना कळणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा की त्याला गणितात रस आहे की इंग्रजीत रस आहे चित्र काढण्यात रस आहे की खेळण्यात रस आहे की घरातील कोणत्याही वस्तू उघडून त्यात लुडबूड करण्यात रस आहे की गाणं गाण्यात रस आहे की लेखन वा अवांतर वाचन की उत्तम बोलण्यात आहे (ही यादी बरीच लांबवता येऊ शकते) याकडे पालकांनी बारकाईने लक्ष ठेवायला हवं. मुलांच्या अशा आवडीच्या बाबींवर मुलांना लक्ष केंद्रित करायला लावलं आणि त्यासाठी त्याला सतत प्रोत्साहन दिलं तर भविष्यात दोघांवरही करिअरच्या अनुषंगाने तणाव येणार नाही.

आपण नेहमी सचिन तेंडुलकर याचं उदाहरण देत असतो. त्यांच्या लहानपणीची गोष्टही आपणास ठाऊक असते की, त्याच्या बाबांनी सचिनची क्रिकेट खेळण्यातली गती ओळखली आणि त्याला अभ्यासास भरीस न घालता त्यांनी त्याला क्रिकेट खेळण्यास मुभा दिली. सचीन हा जन्मत: उत्तुंग प्रतिभा घेऊन आला असला तरी त्याच्या बाबांनी त्याला प्रारंभी क्रिकेट खेळण्याच्या वेडापासून दूर सारलं असतं तर आपला देशच नव्हे तर जगही सर्वकालीक एका श्रेष्ठ क्रिकेटपटूस मुकला असता. पी.व्ही.सिंधू किंवा सायना नेहवाल या दोन जागतिक कीर्तिच्या बॅडमिंटन खेळाडूंचे उदाहरण सुध्दा जवळपास असेच आहे.

आपण सुध्दा आपल्या मुलांच्या बाबत असं कां बरं करु शकत नाही? मुलाला जे करायला हवं असतं ते त्याला करु देणं गरजेचं असतं. (अर्थातच चांगल्या अर्थाने! त्रैलोकी झेंडा गाडणारा गुंडा-बिंडा नव्हे!) त्याला मनापासून आंनदानं प्रोत्साहन देणं अत्यंत आवश्यक आहे. सध्याच्या काळात तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, तुमचं नाणं खणखणितपणं वाजलं पाहिजे. तुम्ही जर विड्याचं पान दुकान सुरु केलं आणि त्यात प्रभुत्व मिळवलं म्हणजेच ग्राहकांना उत्तम सेवा दिली तर ग्राहक रांगा लावतील. (जवळपास प्रत्येक गावात अशी उदाहरणं सापडतातच.) फक्त अमुक एक व्यवसाय श्रेष्ठ नि दुसरा कनिष्ठ असं अजिबात समजायला नको. संजीव कपूर शेफ झाला. म्हणजे आपल्याकडच्या भाषेत आचारी. काहीजण त्याची हेटाळणी तशी करतातही. पण त्याच्या आईबाबांनी नि त्याने स्वत:ला कशात गती आहे हे ओळखलं नि तो आज त्या क्षेत्रातला सूपरस्टार आहे. त्याच्या स्वत:च्या नावाने ओळखली जाणारी अशा मसाले पदार्थांची श्रृखंला आज बाजारात आली आहे. डान्स इंडिया डान्स इंडिया या रिॲलिटी शो मधून समोर आलेला धर्मेश येलांडे या वडोदरा निवासी मराठी मुलाची कथाही अशीच प्रेरणादायी आहे. अतिशय गरीब घरातील या मुलाच्या डान्स पॅशनला त्याच्या अर्धशिक्षित आईबाबांनी प्रोत्साहित केलं. त्याचे पाय मागे ओढले नाहीत. आज धर्मेश तरुणपिढितील आघाडीचा नृत्य रचानाकार- कोरिओग्रफर समजला जातो.

संधी टप्प्याटप्यावर

तेव्हा, संधी टप्प्याटप्यावर आहे आणि कोणत्याही क्षेत्रात मिळू शकते. खूप खर्च करण्याची, पाचवीपासूनच आयआयटी प्रवेशासाठी लाखो रुपयांची शिकवणी लावण्याची गरज नाही. वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी लाखो रुपये देण्याची गरज नाही. ज्या पालकांना असं करायचं असेल किंवा हे करण्यातच ज्यांना कर्तव्यपूर्ती केल्याचं वाटत असेल त्यांनी तसं करावं. शेवटी हा ज्याचा त्याचा समजुतीचा आणि खऱ्या-खोट्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. हा करतो म्हणून तो करतो नि तो करतो म्हणून आपण करत राहतो. ही स्पर्धा घातक आणि वेडगळ अशी आहे.

स्वप्न मोठीच बघायची असतात, यात दुमत नाही. पण आपण जी स्वप्न बघतो ती डोळे झाकून! अशी स्वप्न फारशी वास्तवात येत नाहीत. डोळे उघडून बघितलेली स्वप्नच खरी होत असतात. कारण ही स्वप्नं वस्तुस्थितीवर आधारित असतात. आपल्या मुलाच्या बौध्दिक, शारीरिक आणि मानसिक क्षमतेची जाण पालकांना पूर्णपणे माहीत असायला हवी. स्वत:च्या आर्थिक क्षमतेचीही वस्तुनिष्ठ जाणीव असावी. सध्याची बरीच पालक मंडळी हे करत नसल्यानं एका मोठ्याच जीवघेण्या दौडीत स्वत:ला ढकलून देतात. या स्पर्धेचा भाग आपल्या मुलांना बनवतात. हे टाळणं आपल्या हाती आहे.

रिअरचा आनंद

करीअर घडवणं ही एक सुंदर कल्पना आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी असलेले काही मुलभूत गुण,कला आणि सर्जनशीलता आणि त्याच्या विशिष्ट बुध्दीमत्तेनुसार तो नक्कीच यशस्वी होऊ शकतो. प्रत्येक मुलगा हा देवानेच वैशिष्टयपूर्णच बनवलेला असतो. त्यामुळेच एकच विराट कोहली होऊ शकतो किंवा मार्क झुबेर होऊ शकतो. प्रत्येकानेच आपल्या मुलामध्ये विराट, मार्कझुबेर, सत्या नाडेला, रणवीरसिंह,नीरज चोप्रा बघू नये. तुमचा मुलगासुध्दा “स्पेशल” आहे, “खास” आहे. त्याच्या अंगी असलेला छोटा-मोठी (दैवी) गुण तुम्ही ओळखला तर तो कोणत्याही क्षेत्रात नाव कमावेलच आणि तुम्हाला आनंद आणि समाधान देईल.

सध्याच्या काळातील स्पर्धा मोठी जिवघेणी आणि अक्राळविक्राळ आहे. ती कायमच राहणार. त्याला तोंडसुध्दा द्यावेच लागेल. पण त्यासाठी घरीदारी ताणतणावाला निमंत्रण देणं गरजेचं नाही. मुलाचा जन्म, त्याचं कला-कलानं वाढणं, त्याचं शिकणं आणि त्याचं करिअर घडणं हा पालकांसाठी आनंदायी प्रवासच ठरायला हवा. तो तसा ठरु शकतो. त्यासाठी आपण आपली मानसिकता बदलायला हवी. ती तशी बदलली की मुलही मोकळे होतील आणि फुलपाखरांसारखं उडू लागतील. त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात. त्यांना तसे उडू द्या आणि बळ द्या त्यांच्या पंखांना.