कापसाच्या दरात वाढ होणार? पण कधी? जाणून घ्या…

महाराष्ट्र

औरंगाबाद: सध्या महाराष्ट्रात कापसाच्या दरात सातत्यानं घसरण होत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळं काही शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अभ्यासकांच्या माहितीनुसार कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ झाली होती. यावर्षी देखील मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ होईल अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्विंटल कापसाला 11 हजार रुपयांहून अधिकचा दर मिळण्याची शक्यता

गेल्या वर्षी मार्च-एप्रिलपर्यंत कापसाचे दर वाढले होते. यंदाही मार्च-एप्रिलमध्येच कापसाचे भाव वाढण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. शेतकरीही मार्च-एप्रिलपर्यंत वाट पाहत आहेत. कापसाच्या भावात प्रतिक्विंटल 11 हजार रुपयांहून अधिक वाढ होऊ शकते, असे शेतकऱ्यांचं देखील म्हणणं आहे. ज्या शेतकऱ्यांकडं कापूस ठेवायला जागा नाही, ते शेतकरी स्वस्त दरात कापूस विकत आहेत.

सध्या कापसाला 7 हजार 500 ते 8 हजार 200 रुपयांचा दर

दरम्यान, केंद्र सरकारनं कापसाची किमान आधारभूत किंमत 6 हजार 380 रुपये निश्चित केली आहे. या एमएसपीला शेतकरी अपुरे किंमत म्हणत आहेत. एवढ्या रकमेवर कापसाचा खर्चही व्यवस्थित निघत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले. दर कमी असल्यामुळं बाजारात विक्रीसाठी कमी कापूस जात आहे. सध्या 7 हजार 500 ते 8 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विकला जात आहे. येत्या काही दिवसांत कापसाची मागणी वाढल्यास त्याचे दरही सुधारतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.