दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; तूर, सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान
अकोला: कमी पर्जन्यमान आणि पावसातील प्रदीर्घ खंडामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी बाळापूर तालुक्यातील धधम आणि व्याळा गावांना भेट देऊन पीक नुकसानीची पाहणी केली. ‘शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; भरघोस मदत करण्यात येईल,’ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी धधम येथील जी. टी. जाधव यांच्या शेतात तसेच व्याळा येथील सविता वासुदेव वाशिमकर यांच्या शेतात जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि व्यथा जाणून घेतल्या.
पावसात दीर्घकाळ खंड पडल्याने तूर, सोयाबीनसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक संकटामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना धीर देत शिंदे म्हणाले की, “शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. शासन त्यांच्यासोबत आहे. येणारी दिवाळी काळी होऊ देणार नाही.”
शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाली असून, लवकरच यासंदर्भात अधिसूचना काढण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे. अशा संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत,” असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
यावेळी कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार अनुप धोत्रे, आमदार संजय गायकवाड, आमदार किरण सरनाईक, महापौर शारदा खेडकर यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.