मुंबई: टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून युवक काँग्रेसने भाजपा महायुती सरकारविरोधात आक्रमक भूमिका कायम ठेवत सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन केले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने करत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
रविवारी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर शनिवारी ठाण्यात फुटल्याचा आरोप झाल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे लाखो परीक्षार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला. राज्य सरकारला एकही परीक्षा पारदर्शक आणि सुरळीतपणे घेता येत नसल्याचा आरोप करत सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याची टीका करण्यात आली.
मागील महिन्यात नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संताप व्यक्त होत असतानाच आता टीईटी परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळेही विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे.
यापूर्वी काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या वाहनाला काळे झेंडे दाखवण्यात आले होते. तसेच मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेरही आंदोलन करण्यात आले होते.शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा राजीनामा आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे.